इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वारंवार इशारे देऊनही हिजाब घातल्याबद्दल सहा मुस्लिम विद्यार्थिनींना कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी शाळेतून बाहेर काढले. तर दुसऱ्या एका कारवाईत, बारा विद्यार्थिनींना वर्गात असताना हिजाब परिधान केल्याबद्दल शाळेतून परत पाठवण्यात आले.
वृत्तसंस्था एएनआयने याविषयी सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून माहिती घेतली. “शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालून येण्यास मनाई असूनही काही विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या. त्यामुळे त्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले. सहा दिवसांच्या कार्यकाळासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हिजाबच्या मार्गदर्शक तत्त्वांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी उप्पिनगडी शासकीय प्री युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हे प्रकरण घडले आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी कॉलेजच्या प्राध्यापकांसोबत बैठक घेऊन विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थिनींना सरकारी आदेश आणि उच्च न्यायालयाच्या वर्गात हिजाब घालण्यास मनाई करण्याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली.
हम्पनाकट्टे परिसराजवळील मंगळुरु विद्यापीठ महाविद्यालयाचे अधिकारी हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना परत पाठवत आहेत. गुरुवारी, हिजाब परिधान केलेल्या १६ विद्यार्थिनींनी त्यांना वर्गात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना वर्गात प्रवेश नाकारून परत पाठवले. हा निर्णय प्राचार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थिनींनीही जिल्हा आयुक्त कार्यालयात जाऊन हिजाब घालून वर्गात जाऊ न दिल्याबद्दल तक्रार केली होती. जिल्हा कार्यालयानेही त्यांना सरकारचे नियम आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मुलींनी न जुमानता गुरुवारी हिजाब घालून कॉलेज गाठले.
उडुपी प्री-युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेजच्या सहा विद्यार्थिनींनी सुरू केलेला हिजाबचा वाद राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने वर्गात हिजाबसह कोणतेही धार्मिक चिन्ह परिधान करण्याविरुद्ध निर्णय दिला. शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या विद्यार्थिनींनी दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली होती.