ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ते अपघाताची संख्या आधीच मोठी असताना आता रस्त्यातील खड्ड्यांनी अपघाताच्या प्रकरणांमध्ये आणखी भर टाकली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील आमगाव फाट्याजवळ खड्ड्यांमुळे अवघ्या २४ तासांत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तलासरी पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आमगाव येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री मोटार आणि टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. तर, मंगळवारी दुपारी आणखी एक मोटार आणि टेम्पोमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखरेख, दुरुस्ती करणारी कंत्राटदार कंपनी आर. के. जैन इन्फ्रा प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक राम राठोड आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने हलगर्जीपणा केल्याचा ठपका तलासरी पोलिसांनी ठेवला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, याबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात तातडीच्या उपाययोजनांची सूची देण्यात येणार असून यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीनंतर योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करू, असे पालघर पोलिसांनी सांगितले आहे.
Highway Road Potholes Accident Death Contractor Police FIR
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD