मुंबई – सध्याच्या काळात अनेक तरुणांना सर्वाधिक पगाराची नोकरी हवी असते, यासाठी ते उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा तयारी करतात. परंतु प्रशासकीय खात्यात नोकरीपेक्षा बँकींग क्षेत्रात सर्वाधिक प्रकारची नोकरी तरुणांना मिळू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये ग्रेड बी अधिकाऱ्याची भरती झाल्यास सर्वाधिक पगार मिळतो.
आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग, सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग आणि सामान्य विभाग अशा विविध विभागांमध्ये ग्रेड B च्या अधिकाऱ्यांच्या पदांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे थेट भरती केली जाते. आरबीआयमध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांच्या पदांसाठी सुरू होणारा पगार हा भारतातील सर्वोच्च पगाराच्या सरकारी नोकऱ्यांपैकी एक मानला जातो.
2021 मध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विहित निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 35,150 रुपये प्रारंभिक वेतन दिले जाते. याशिवाय, उमेदवार महागाई भत्ता, स्थानिक भत्ता, कुटुंब भत्ता आणि श्रेणी भत्ता यासाठी देखील पात्र आहेत. अशा प्रकारे, नियुक्तीनंतर उमेदवाराचे एकूण प्रारंभिक मासिक वेतन अंदाजे 83,254 म्हणजेच वार्षिक 9 लाख 99 हजार रुपये आहे. तसेच बँकेने निवास व्यवस्था केली नाही, तर मूळ वेतनाच्या 15 टक्के घर भत्ता म्हणून दिले जातात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रेड बी अधिकारी पदासाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुण किंवा एकूण 55 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेली असावी, तसेच उमेदवाराचे वय अधिसूचनेच्या वर्षात 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित श्रेणींना वयोमर्यादेत शिथिलता देखील दिली जाते.