नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय शिक्षण तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज नवी दिल्ली येथे स्टडी इन इंडिया या पोर्टलचा प्रारंभ केला. शिक्षणाचे जागतिक केंद्र अशी भारताची ओळख पुन्हा एका प्रस्थापित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे पोर्टल तयार केलं गेलं आहे. विविध विभागांचे मंत्री, शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच दहापेक्षा जास्त देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला रशिया, थायलंड, जपान, इथिओपिया, इक्वेडोर, कझाकस्तान आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांचे सध्या भारतात राहून शिक्षण घेत असलेले असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांच्या सन्मानार्थ त्यांना आपापल्या देशांची सांस्कृतिक प्रतीके स्मृतिचिन्हे म्हणून भेट दिली.
स्टडी इन इंडिया पोर्टल हे भारतातील उच्च शिक्षणविषयक संस्थांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठीचं समर्पित संकेतस्थळ असणार आहे. या संकेतस्थळावर विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या, पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रमांसोबतच, योग, आयुर्वेद, शास्त्रीय कला अशा भारताविषयीच्या ज्ञानाची कक्षा वाढवणाऱ्या अभ्यासक्रमांची आणि शैक्षणिक कार्यक्रमांची माहितीही दिली जाणार आहे. या संकेतस्थळावरून विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण संस्थांकडून पुरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा, संशोधन सहाय्य आणि संबंधित माहिती मिळू शकणार आहे. या नव्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या एकापेक्षा अधिक संस्था किंवा अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. या नव्या संकेतस्थळामुळे विद्यार्थी नोंदणी आणि व्हिसा अर्ज प्रक्रियेसाठीची सोयही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
या संकेतस्थळामुळे भारतात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्वप्रकारची माहिती आणि सोयी उपलब्ध होतील आणि त्यांचा भारतातला शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होईल असं धर्मेद्र प्रधान यावेळी बोलताना म्हणाले. हे संकेतस्थळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गतच तयार केले गेले आहे, त्यातून भारताला विद्यार्थ्यांच्या पसंतीचे शैक्षणिक केंद्र बनवण्याच्या आणि शिक्षणप्रक्रियेतील दऱ्या मिटवून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंबच उमटलें असल्याचेंही प्रधान यावेळी म्हणाले. या पोर्टलच्या माध्यमातून जगभरातील विविधांगी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारत हे शिक्षणाचे जागतिक केंद्र म्हणून घडवण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचे दर्शन होते असं एस.जयशंकर यावेळी म्हणाले.
स्टडी इन इंडिया पोर्टलची ठळक वैशिष्ट्ये:
- प्रतिथयश शिक्षण संस्थांसोबत भागीदारी : स्टडी इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी एक निकष पूर्ण करणाऱ्या शैक्षणिक संस्थांसोबतच भागीदारी केली गेली आहे:
- राष्ट्रीय संस्थात्मक मूल्यांकन आराखड्याअंतर्गतचा [National Institutional Ranking Framework (NIRF)] क्रमांक (<=100) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद [National Assessment and Accreditation Council (NAAC)] मूल्यांकनाअंतर्गचे गुण (> = 3.01)
- राष्ट्रीयपातळीवरील महत्त्वाच्या संस्था [Institutes of National Importance (INI)]
भागीदारासाठीच्या या अटी आणि शर्तींमुळे भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी देशातील प्रतिष्ठित संस्था उपलब्ध असल्याचीही सुनिश्चिती होते. - https://studyinindia.gov.in/ अधिक माहितीसाठी