इंदूर (मध्य प्रदेश) – गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कार चोरीच्या खूपच घटना घडत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेश, राजस्थान, नवी दिल्ली या भागात कार चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे वाहन चालक आणि कार मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुकानांसमोर, रस्त्यालगत, पार्किंगमध्ये किंवा बंगल्याच्या आवारात, सोसायटीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या कार चोरीच्या घटनांनी पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
एका कार चोरीच्या घटनेचा शोध लावताना पोलिसांना आढळून आले की, चोरटे हायटेक तंत्रज्ञानाने कार चोरी करत होते. विशेष म्हणजे हे कारटे अशिक्षित आहेत. कोडींगच्या साह्याने कार अनलॉक करुन पळवून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आता सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी परत पावले उचलली आहेत. सुशिक्षित चोरटे लॉक केलेली अनलॉक कार करू शकतात, हे आपण जाणू शकतो. परंतु अशिक्षित चोरटे देखील कार अनलॉक करतात तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटते. इंदूरमध्ये देखील अशीच घटना घडली.
इंदूर शहरात आलिशान गाड्या चोरणाऱ्या हायटेक वाहन चोर टोळीतील श्रावण विश्नोई याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे टोळीचा म्होरक्या गणपत विश्नोई हा चौथा पास आहे. तो शस्त्रे आणि चावीशिवाय कोडींग सॉफ्टवेअरच्या सहाय्याने दोन ते तीन मिनिटांत कार अनलॉक करतो. डिजिटल मार्केटिंग कंपनीचे ऑपरेटर भरत आहुजा यांची कार या चोरट्यांनी पहाटे चोरून नेली. पोलिसांनी नाकाबंदी केली, मात्र चोरांचा म्होरक्या गणपत साथीदार पप्पूसह बॅरिकेड तोडून पळून गेला. त्यानंतर आता विजयनगर, खजराना, राजेंद्रनगर, लासुदिया परिसरात झालेल्या आलिशान गाड्यांबाबत पोलीस चौकशी करत असताना चोरट्यांनी अनेक कार चोरी बरोबरच तसेच हवाला आणि ड्रग्ज पुरवठ्यात सामील असल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील रहिवासी भरत आहुजा यांची कार रात्री घराबाहेर उभी होती. सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी ते उठले. तेव्हा कार गायब असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की, तीन चोरटे पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आले. भरतची कार चोरून ते पळताना दिसले. पहाटे ४ वाजता चोरट्यांनी स्वतःची कार भरत यांच्या गाडीजवळ लावली. तिघेही चोरटे खाली उतरले. एकाने लॅपटॉपवरून भरतची गाडी अनलॉक केली. दुसरा स्टार्ट करून निघून गेला. आरोपींनी अवघ्या ७ मिनीटात कार चोरून नेली.
पोलिसांनी नयाखेडा येथून भरतची कार जप्त केल्यानंतर, वाहन चोर श्रावण विश्नोईलाही अटक करण्यात आली आहे. मात्र, गाडीचे कुलूप उघडणारा गणपत लॅपटॉप आणि उपकरणे घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. चोरट्यांनी आधीही अनेक कार चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र घटनेच्या वेळी त्याचे लोकेशन इंदूरमध्येही आढळून आले. श्रवण आणि गणपत यांना यापूर्वी अहमदाबादमध्ये २० वाहने चोरी करताना पकडण्यात आले होते.