नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तलाठी परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या प्रश्नप्रत्रिका आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कालच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत त्याला १३८ गुण मिळाल्याचे वृत्त आले. त्यानंतर आता ही नवीन माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुसिंगे हा पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे. त्याला या प्रकरणात अद्याप अटक झालेली नाही, पण, नाशिकच्या तलाठी पेपर फुटीप्रकरणी त्याला नाशिक पोलिसांनी गजाआड केले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर अनेक माहिती समोर येत आहे. या सर्व गैरप्रकारामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मोठा धक्का आहे.
नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या प्रश्नपत्रिका देखील सापडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही परिक्षा सुध्दा वादात सापडण्याची शक्यता आहे. गुसिंगे यांच्यावर म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०१९ मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर गुसिंगेवर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय असल्यामुळे पोलिस कसून तपास करत आहे.
High Tech Copy Case Ganesh Gusinge Mobile Question Paper
Nashik Police Investigation Government Recruitment Exam