इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता प्रभासची प्रमूख भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले असले तरी अद्यापही या चित्रपटाचा वाद थांबताना दिसत नाही. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नुकतीच याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची आज सुनावणी झाली आणि न्यायालयाने चित्रपट निर्मात्याला जोरदार फटकारले आहे.
वकील कुलदीप तिवारी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आज (२६ जून) सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले. या संदर्भात याचिकाकर्त्याने निवेदन जारी केले की, “आदिपुरुष संदर्भात आमच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपीठाने सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले.” सेन्सॉर बोर्डाच्यावतीने उपस्थित अधिवक्ता अश्विनी यांना विचारले की, सेन्सॉर बोर्ड काय करते? सिनेमा हा समाजाचा आरसा आहे. सेन्सॉर बोर्डाला आपली जबाबदारी कळत नाही का?
केवळ रामायणच नाही तर कुराण, गुरू ग्रंथ साहिब आणि गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांना तरी वाचवा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणावर २७ जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. आदिपुरुषच्या अनेक संवादांवर प्रेक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. चित्रपटाला होणारा वाढता विरोध पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचे संवाद बदलले आहेत. मात्र, यातूनही काही फायदा होताना दिसत नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आतापर्यंत केवळ २७७ कोटींची कमाई करू शकला आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय सैफ अली खान, क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.