तिरुअनंतपुरम – झेंड्याचा खांब अवैधरित्या लावणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या संलग्नतेच्याही पलिकडे जाऊन कारवाई करण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. सत्तेत बसलेलेसुद्धा कायद्यापेक्षा मोठे नाहीत, अशा शब्दात न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले आहेत. केरळमध्ये झेंड्याचे खांब अवैधरित्या लावू नये या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सत्ताधारी पक्षाने उल्लंघन केल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे.
न्यायमूर्ती देवन रामचंद्रन म्हणाले, तुम्ही किती मोठे आहात, याने काहीच फरक पडत नाही. कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे. कायदा आणि सरकार असे दोन्हींचे ज्ञान असलेले लोक सत्तेत बसलेले आहेत. त्यांचे उत्तरदायित्व अधिक असले पाहिजे. रामचंद्रन म्हणाले, की मला झेंड्याच्या रंगाबद्दल काही देणेघेणे नाही. येथे झेंड्याचा लाल रंग आहे. हे खुलेआम उल्लंघन आहे.
सामान्य नागरिक किंवा विरोधी पक्षात असलेले लोक अशी कृती करतात अशी आमची धारणा होती. परंतु सत्ताधार्यांनी अशी कृती करावी का? काही नागरिकांकडून आम्हाला एखाद्या विशिष्ट पक्षाशी संबंधित असल्याचे किंवा संघी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आम्हीच नव्हे, तर उच्च न्यायालयानेही अशा प्रयत्नांसमोर झुकू नये.
सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणाशी संबंधित खटल्यावर न्यायालय सुनावणी करत होते. एका सहकारी सोसायटीने आरोप केला की, एक राजकीय पक्ष त्यांच्या जमिनीवर झेंडा आणि बॅनर अवैधरित्या लावत आहे. त्यावर काही जिल्हाधिकार्यांकडून राज्यात झेंड्यांचे खांब अवैधरित्या लावणार्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. इतरही अशीच कारवाई करणार आहे, असे राज्य सरकारकडून न्यायालयाला सांगण्यात आले.