भोपाळ (मध्य प्रदेश) – तुम्ही जर स्टेनोग्राफरसाठी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत सुवर्णसंधी आहे. तसेच, खासकरुन न्यायालयात नोकरीची शोधू इच्छिणाऱ्यांनाही मोठी संधी प्राप्त झाली आहे. उच्च न्यायालयात तब्बल १२५५ जागांची जम्बो भरती निघाली आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरीत अर्ज करा.
उच्च न्यायालयाने टंकलेखक (स्टेनोग्राफर) आणि सहाय्यक (असिस्टंट) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सर्व इच्छुक उमेदवार MP High Court Recruitment 2021 साठी ३० डिसेंबर २०२१ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे.
या प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण १२५५ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टंकलेखक श्रेणी २ ची १०८ पदे, टंकलेखक श्रेणी ३ ची २०५ पदे, टंकलेखक श्रेणी ३ (न्यायालय व्यवस्थापक स्टाफ)ची ११ पदे, सहाय्यक श्रेणी ३ ची ९१० पदे आणि सहाय्यक श्रेणी ३ (इंग्रजी)ची २१ पदे, अशा पदांचा समावेश आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयात या पदांसाठी उमेदवारांना ५२०० रुपयांपासून ते २०२०० रुपये प्रतिमहिना असे वेतन दिले जाणार आहे. वेतनाशिवाय उमेदवारांना वेतन श्रेणी सुद्धा दिली जाईल.
अधिकृत अधिसूचनेनुसार, टंकलेखकासह इतर पदांच्या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही पदवी परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयाची अट शिथिल असेल. शैक्षणिक योग्यता आणि वयाच्या अटीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम परीक्षा आणि मेन्स परीक्षेच्या आधारावर केले जाणार आहे. या प्रिलियम परीक्षेत एकूण १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत १०० पर्यायीरूपी प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा वेळ दोन तास असेल. सर्व इच्छुक उमेदवार MP High Court Recruitment 2021 च्या http://www.mphc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वर ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील (जनरल) उमेदवार आणि इतर राज्यांच्या उमेदवारांना ७७७ रुपये शुल्क अदा करावे लागतील. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.