अहमदाबाद – क्षुल्लक कौटुंबिक वादातून सूनेला नोकरीवरून काढण्यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या सासूलाच न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने या सासूला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे सून जोमात आणि सासू कोमात असाच काहीसा हा प्रकार घडला आहे.
उत्तर गुजरात येथील अरवल्ली जिल्ह्यातील रसिला खराडी या महिलेने गुजरात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यात तिने म्हटले की, सूनेने खोटी माहिती देऊन सरकारी नोकरी प्राप्त केली आहे. महिलेने सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना अविवाहित असल्याचे सांगितले होते, असे सासूचे म्हणणे आहे. ज्यावेळी तिने नोकरीसाठी अर्ज केला त्यावेळी तिची घटस्फोटाची केस न्यायालयात प्रलंबित होती. हे प्रकरण २०१६ पासून न्यायालयात आहे, असेही तिने म्हटले आहे.
कौटुंबिक वादात दडपण निर्माण करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आपसात वाद सुरू असल्यामुळे महिला तिच्या सूनेला नोकरीवरून काढण्याची मागणी करीत आहे, असे सांगून याप्रकारची प्रकरणे न्यायालयात कशी काय आणू शकता, असा कडक सवालही याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केला. आता सासूला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. थोडक्यात काय तर सून जोमात आणि सासू कोमात, अशी अवस्था झाली.