इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आरोपीने लैंगिक हेतूने शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याचे सिद्ध झाल्यास लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला जाईल, असा निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय २०१७च्या एका खटल्याच्या संदर्भात आला आहे. १३ वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेच्या घरी कोणी नसताना आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. खटल्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याने मुलीच्या शरीराच्या विशिष्ट भागांचा विकासच झाला नसल्याचा जबाब दिल्याने पीडितेच्या स्तनांना स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आरोपीने कारवाईदरम्यान सांगितले. यावर न्यायमूर्ती विवेक चौधरी यांनी निरीक्षण नोंदवले की, “तेरा वर्षांच्या मुलीच्या शरीराचा कितपत विकास झाला आहे की नाही हे महत्त्वाचे नाही. शरीराचा विकास झाला नसला तरी लिंग, योनी, गुदद्वार किंवा स्तनांना स्पर्श करणे किंवा लैंगिक हेतूने मुलाला स्पर्श करणे हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे.
एका तेरा वर्षांच्या मुलीशी जवळीक साधण्यामागचा हेतू काय असू शकतो, असे विचारले असता न्यायालयाने सांगितले की, “सध्याच्या प्रकरणात पीडित मुलीने म्हटले आहे की, आरोपीने तिच्या शरीराच्या विविध भागांना स्पर्श केला.” पीडित मुलीशी संबंधित नसलेल्या व्यक्तीने तिचे पालक उपस्थित नसताना तिच्या घरी का जावे?आरोपीच्या विशिष्ट संपर्कांवरून आणि आजूबाजूच्या परिस्थितीवरून एखाद्या व्यक्तीचा लैंगिक हेतू दिसून येतो”, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
तसेच लैंगिक हेतूचा कोणताही थेट पुरावा असू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात पालकांच्या अनुपस्थितीत घरात घुसून जवळीक साधण्याचा प्रयत्न आरोपीचा हेतू स्पषअट करतो. त्यामुळे आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कलम ८ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे.