इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या पोटातून जन्म दिलेल्या, स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची घटना पंजाब–हरियाणा उच्च न्यायालयातील एका प्रकरणात समोर आली आहे. ही हत्या करण्यासाठी मला प्रवृत्त केले असल्याचे आरोपी महिलेचे म्हणणे असून, जामीन मागणारी याचिका तिने केली होती. यावर सुनावणी करताना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ८ ऑगस्ट २०१८ रोजी ममता हिला नारी निकेतन कर्नाल येथून बाल न्याय मंडळ, रोहतकसमोर आणले होते. तक्रारदार स्वत: कॉन्स्टेबल असून त्यांच्यासोबत एसआय नरिंदर होते. एका प्रकरणात ममताला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयातील काम झाल्यानंतर ममता परतत असताना तिच्या दत्तक पालकांनी कोर्टाच्या आवारात दोन मुलांना ती आपली मुलगी असल्याचा इशारा दिला आणि सगळे न्यायालयाबाहेर रस्त्यावर आले. तेवढ्यात इशारा दिलेले तरुणही मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. यात ममता आणि एसआय नरिंदर यांचा मृत्यू झाला. ममताने जातीबाहेर लग्न केले होते. त्यामुळे इज्जतीला ठेच लागल्याचे कारण पुढे येत असून, त्यामुळेच तिच्या जन्मदात्या आईने हे कृत्य घडवून आणल्याचे समोर येत आहे.
या प्रकरणात पुरावे तपासून ममताच्या आईला दोषी ठरवण्यात आले आहे. जामीनासाठी याचिका करणारे आणि मुलगी दत्तक घेणारे दोघे एकमेकांशी संबंधित आहेत. मुलीच्या दत्तक पालकांनी याचिकाकर्त्याच्या संगनमताने हा कट रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे कृत्य झाल्यास याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारची दयेचा हक्क मिळत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. इज्जतीचे कारण पुढे करत घडवून आणलेले हे कृत्य माफ करण्यासारखे नसल्याचेही यावेळी उच्च न्यायालयाने म्हटले आहे.