मुंबई – मुलांच्या नावामागे वडिलांचे नाव आणि आडनाव लावण्याची पद्धत भारतात आहे. कागदोपत्री, सरकारदरबारी हीच पद्धत स्वीकारली गेली आहे. मात्र मुलांना वडिलांचे नाव आणि आडनाव लावायचे नसेल ते तर त्यांना आईचे आडनाव लावण्याचा अधिकार आहे, असा निर्वाळा अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. त्याचवेळी वडिलांना मुलीवर अधिकार गाजविण्याचा अधिकारही नाही, असेही न्यायालय म्हणाले.
एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुलीच्या कागदपत्रावर आईच्या आडनावाच्या ऐवजी आपले आडनाव लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावे, अशी विनंती त्याने याचिकेत केली होती. न्या. रेखा पल्ली यांनी हे आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचवेळी कोणताच बाप मुलीला आपले आडनाव वापरण्याची बळजबरी करू शकत नाही, असेही न्यायालयाने खडसावले. मुलगी जर तिच्या आईचे नाव आणि आडनाव वापरून आनंदी असेल, तर तुम्हाला अडचण कोणती आहे, असा सवालही न्यायालयाने मुलीच्या वडिलांना केला. प्रत्येक अपत्याला आपल्या आईचे आडनाव वापरण्याचा अधिकार आहे, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. पत्नी लांब राहायला लागल्यानंतर तिने मुलीची सगळी कागदपत्रे बदलून टाकली, असा आक्षेप याचिकाकर्त्याने न्यायालयात घेतला होता. मुलीच्या नावात बदल झाल्यामुळे तिला विम्याचे पैसे मिळण्यास अडचण येईल, असाही युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला. मात्र न्यायालयाने कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला. अर्थात शाळेत संपर्क साधून मुलीच्या वडिलांच्या नावावर आपले नाव टाकण्याचा आग्रह त्याला करता येईल, असे आदेश दिले.