नवी दिल्ली – बलात्काराच्या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. बरेचदा बलात्कारानंतर आरोपी आणि पीडितेचा विवाह लावून देण्यात येतो. त्यानंतर प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न असतो. पण एकदा केस न्यायालयात गेली की आरोपीवर कारवाई ठरलेलीच आहे. अशात न्यायालयाकडून दिलाशाची अपेक्षा करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले आहे.
बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. पुरुष आणि महिलेत घटनेनंतर लग्न लावून देण्यात आले म्हणजे आरोपीचा गुन्हा माफ झाला, असा अर्थ होत नाही, या शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपीला फटकारले. तसेच त्याला दिलासा देण्यास नकार दिला. न्या. मुक्ता गुप्ता यांच्या समक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. हॉटेलमध्ये आपल्यावर बलात्कार झाला, अशी तक्रार महिलेने शुद्धीत नसताना केली होती. तिला भ्रम झाला होता. आता दोघांनीही लग्न केले आहे आणि त्यांचा संसार सुखात सुरू आहे. पुरुषावर दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना लग्न होणे म्हणजे गुन्हा माफ होणे नाही, असे स्पष्ट केले. बलात्कार हा गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याचा करार झाला म्हणून गुन्हा रद्द होत नाही, असेही न्यायालय म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पहाडगंज पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झाली होती. त्यात आरोपीने एका हॉटेलच्या खोलीत महिलेसोबत बलात्कार केल्याचे नमूद होते. लग्नाशिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित करू देणार नाही, असे आपण स्पष्ट केले होते, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते.