चंदीगड – पोटच्या मुलांना वार्यावर सोडून प्रेम करणे प्रेमी युगुलाला महागात पडले आहे. आधीच्या जोडीदाराकडून जन्म झालेल्या मुलांची देखभाल कशी करणार, असा सवाल संरक्षणाची मागणी करण्यासाठी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या युगुलाला न्यायालयाने विचारला आहे. मुलांच्या देखभालीसाठीच्या भत्त्यासाठी दोघांच्या संपत्तीची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याचिका दाखल करताना प्रेमी युगुलाने न्यायालयाला सांगितले, की दोघेही विवाहित आहेत. परंतु दोघांनाही जोडीदारासोबत राहण्याची इच्छा नाहीय. दोघेही मेवातमधील नूंह येथील रहिवासी आहेत. दोघे मुस्लिमधर्मीय आहेत. कुटुंबाविरोधात जाऊन दोघांनीही सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कुटुंबीयांकडून त्याच्या जीवाला धोका आहे. महिलेला आधीच्या जोडीदाराकडून ५ मुले, तर पुरुषाला ४ मुले आहेत. दोघेही सोबत राहात असून त्यांच्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याने संरक्षण पुरवावे अशी मागणी युगुलाने याचिकेत केली.
उच्च न्यायालयाने संरक्षणाच्या मागणीवर दोघांनाही विचारले, या ५ आणि ४ मुलांची देखभाल कशी करणार आहात. मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी त्यांच्यासाठी भत्ता निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे दोघांनीही त्यांची चल-अचल संपत्ती किती आहे, याबद्दल माहिती सादर करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.