नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘जयेशभाई जोरदार’ या रणवीर सिंगच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गर्भाचे लिंगनिदान दाखवणाऱ्या एका दृश्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना सांगितले की, बेकायदेशीर प्रथा चित्रपटांमध्ये दाखवता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मे रोजी होणार आहे.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे की चित्रपटाचा एकूण संदेश चांगला असू शकतो, परंतु गर्भवती महिलेला सोनोग्राम मशीनद्वारे गर्भाचे लिंग तपासण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये नेले जाऊ शकते हे दाखवता येणार नाही. नवीन चावला यांच्या खंडपीठाने १३ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबाबत सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करा अन्यथा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबवावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटातील दृश्यात कोणीही दवाखान्यात जाऊन बाळाची लिंगनिदान चाचणी करु शकतं असं दाखवलं जाऊ नये. त्याउलट लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यादृष्टीने चित्रपट बनवले गेले पाहिजेत असेही न्यायालयाने म्हणले आहे.
ज्येष्ठ वकील जयंत मेहता यांनी चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने उपस्थित राहून बाजू मांडली. चित्रपटाच्या सुरुवातीलाच डिस्क्लेमर देत हा चित्रपट मनोरंजनासाठी असल्याचे म्हणले आहे, असे त्यांनी सांगितले. पण हा डिस्क्लेमर अजिबात लक्षात येण्यासारखा नाही असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. युथ अगेन्स्ट क्राईम या याचिकाकर्त्यांतर्फे वकील पवन प्रकाश पाठक यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की हा चित्रपट लिंग निर्धारणाचे साधन म्हणून अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा प्रचार करू शकत नाही, कारण ते कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. याबाबत न्यायालयानेही म्हणणे मांडले आहे. हा चित्रपट समाजातील वाईट गोष्टी दाखवत आहे की लिंग निर्धारणाचे तंत्र अवलंबण्याचे समर्थन करत आहे, असा सवाल न्यायालयाने केला आहे. स्त्रीभ्रुणहत्या हा अतिशय चिंतेचा विषय असल्याने न्यायालयाने दखल घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. १० मे रोजी होणाऱ्या सुनावणीत चित्रपट निर्मात्यांना काही सूचना दिल्या जाणार आहेत.