मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपालपदाची राजकीय चर्चा तशी होत नसते. पण भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राला लाभलेले असे पहिले राज्यपाल आहेत, जे त्यांच्या राजकीय उपक्रमांसाठी कायम चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आणि आता आणखी एका नव्या संकटात ते सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्यामागचे ग्रहण काही सुटत नाहीये.
राज्यपाल कोश्यारी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांची काही विधानं इतकी आक्षेपार्ह होती की भाजपच्याच नेत्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. त्यामुळे कंटाळून त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली. उर्वरित आयुष्य चिंतन करण्यात घालवायचे आहे, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. पण पदमुक्त होण्याच्या आधीच त्यांच्यावर आणखी एक संकट ओढवले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदांमध्ये आणि अधिसभांमध्ये राज्यपालांनी केलेल्या नियुक्त्या वादात असतानाच आणखी एक प्रकरण पुढे आले आहे.
निवड वादाच्या भोवऱ्यात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एका नियुक्तीवरून न्यायालयाने राज्यपालांना नोटीस बजावली आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखीय शाखेच्या अधिष्ठातापदी केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
न्यायालयात याचिका
माजी अधिसभा सदस्य डॉ. मनमोहन बाजपेयी यांनी या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. यात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि डॉ. प्रशांत कडू यांना प्रतिवादी केले आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्यपालांना नोटीस बजावली.
समित्यांची स्थापना
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी स्वतंत्र निवड समित्या स्थापन केल्या आहेत. मुंबई व पुणे विद्यापीठांच्या समित्यांवर छत्तीसगड व कर्नाटक न्यायालयातील न्यायमूर्तींची नियुक्ती त्यांनी केली आहे.
High Court Notice to Governor Bhagat Singh Koshyari