नवी दिल्ली – आरोग्य चांगले राखण्यासाठी मसाज करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. आयुर्वेदात त्याचे मोठे महत्त्व सांगण्यात आले आहे. पुरुषांनी स्त्रियांची किंवा स्त्रियांनी पुरुषांची मसाज करण्याचाही ट्रेंड आहे. अनेकदा यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढविले जातात किंवा शंका घेतल्या जातात. त्यामुळेच स्त्रियांनी स्त्रियांची किंवा पुरुषांनी पुरुषांची अशाप्रकारे समलिंगी मसाज करावी, अशीही मागणी होत असते. भिन्न लिंगी मसाज (क्रॉस जेंडर मसाज)बाबत उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या क्रॉस-जेंडर मालिशवर प्रतिबंध लावून त्यांच्यावर कारवाई करू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत. अशा सेवा लैंगिक क्रियाकलाप होत असल्याचे संकेत देत नाहीत, असे न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी म्हटले आहे. क्रॉस जेंडर मालिशवर बंदी लावण्याविरोधात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत वरिष्ठ अधिवक्ता राहुल मेहरा म्हणाले, अशा केंद्रात लैंगिक क्रियाकलाप रोखण्यासाठी योग्य विचार करून धोरण ठरविण्यात आले होते. या धोरणानुसार दिशानिर्देश देण्यात आले आहेत, त्यामुळे धोरणाला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. काही कालावधीपर्यंत हे धोरण लागू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. पंचतारांकित हॉटेलसह अनेक ठिकाणांवर क्रॉस-जेंडर मालिशची परवानगी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालय म्हणाले, हे क्रॉस-जेंडर मालिश आहे. यात लैंगिक क्रियाकलाप होतात असा याचा अर्थ होत नाही. तुम्ही तुमच्या कर्मचार्यांना रोखा. अवैध काम रोखू नये असे आमचे म्हणणे नाही. परंतु अधिकारी फक्त अवैध कामांविरोधात कारवाई करतील, असे दिल्ली सरकारच्या वकिलांनी सांगितले. या महिनाअखेरपर्यंत याचिकांवर सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.