इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बलात्कारचा अर्थ बलात्कारच असतो. जरी तो बलात्कार पतीने केला का असेना. महिलेच्या सहमतीशिवाय शारिरीक संबंध ठेवणे बलात्काराच्या श्रेणीतच ठेवले जाणार आहे. एका प्रकरणात पत्नीवर तिच्याच पतीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. आरोपी पतीवर कलम ३७६ अंतर्गत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या खटल्यात पतीच्या वकिलांनी युक्तिवाद केला, की त्यांच्या अशिलाने महिलेशी विवाह केला आहे. ते महिलेशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. असे संबंध बलात्काराच्या श्रेणीत ठेवले जाऊ शकत नाही. परंचु त्यांचा युक्तिवाद फेटाळत न्यायालयाने माणूस हा माणूस आहे आणि बलात्काराचा अर्थ बलात्कार आहे. अशा संबंधाला बलात्काराच्या श्रेणीतच ठेवले जाईल.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या एकल खंडपीठाने आपल्या निर्णयात सांगितले, की महिला आपल्या पतीची गुलाम असते असे वर्षांनुवर्षे मानले जात आहे. तिच्या प्रत्येक वस्तूवर पतीचा हक्क असतो. तो जेव्हा जसे वाटेल तसे तिच्यासोबत वागत असतो. परंतु ही मान्यता बदलण्याची वेळ आली आहे. महिलेवर झालेल्या अन्यायाच्या प्रकरणात कठोर पाऊल उचलणे आवश्यक आहे.
न्यायालय म्हणाले, की प्रत्येक महिलेला आपले आयुष्य असते. लग्नानंतर पतीचा तिच्यावर हक्क असतो यात काहीच शंका नाही. परंतु तिची स्वतःची इच्छाही असते. पती हवे तेव्हा तिला वापरू शकतो असे नाही. या प्रकरणात पतीला तिच्या इच्छेचा सन्मान करायला हवा. पतीच्या अशा वागण्यामुळे महिलेच्या मनावर विपरित परिणाम होतात.
न्यायालय म्हणाले, बलात्काराच्या आरोपात कलम ३७६ अंतर्गत कारवाई केली जाते. पतीने पत्नीशी जबरदस्तीने संबंध ठेवल्यामुळे पतीला सोडले जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे कलम ३७६ अंतर्गत पतीला दोषी मानले जात नाही. वैवाहिक बलात्काराला भारतीय कायद्यात मान्यता नाही आहे. हा गुन्हा मानला जात नाही.