नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या जोडीदाराच्या चारित्र्यावर खोटा आरोप करून त्याची प्रतिष्ठा आणि आरोग्यावर गंभीररित्या नुकसान पोहोचवण्यासारखे आहे. विवाह हे पवित्र नाते आहे आणि त्याची प्रतिष्ठा सर्व स्थितीत राखली गेली पाहिजे. निरोगी आणि शिक्षित समाजासाठी हे खूपच आवश्यक आहे. अशा आरोपांमुळे मानसिक त्रास, यातना आणि दुःख होते, ते क्रूरतेसमान आहे. न्यायालयाने याची निंदा करणे आवश्यक आहे, असा महत्त्वाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी एका कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हा निर्णय सुनावला आहे.
एका दाम्पत्याचा २०१४ साली विवाह झाला होता. परंतु काही काळातच दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आणि ते वेगळे राहू लागले. महिलेने सासऱ्याविरुद्ध छेड काढल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवला. त्यानंतर तिच्या पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाची याचिका दाखल केली.
कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका मान्य करत महिलेचे आरोप क्रूर असल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले, की कौटुंबिक न्यायालयाने पुराव्यांची योग्य पडताळणी करून योग्य निर्णय दिला आहे. पत्नीने पतीवर खोटे आरोप करून त्याचे चारित्र्यहनन केले आहे असे म्हणत ३१ जानेवारी २०१९ रोजी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
कौटुंबिक न्यायालयाने महिलेपासून वेगळे राहणाऱ्या तिच्या पतीच्या बाजूने हिंदू विवाह अधिनियमच्या तरतुदीअंतर्गत घटस्फोट मंजूर केला. उच्च न्यायालय म्हणाले, की आव्हान देणाऱ्या याचिकेतही संबंधित महिला कौटुंबिक न्यायालयाचे निष्कर्ष चुकीचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी विश्वासपात्र पुरावे दाखवू शकली नाही. तसेच सासरच्या लोकांवर केलेले आरोप जाहीर करण्याच्या कबुलीतून तिचे ती त्यांचा द्वेष करते हे स्पष्ट होते.
न्यायालय म्हणाले, की अशा आरोपांमुळे नातेसंबंधांना तडा जातो, असे आरोप करणे दुर्दैवी आहे. ज्यांच्यावर आरोप झालेले असतात त्यांना मानसिक त्रासातून जावे लागते. ही कृती गंभीर क्रूरता आहे, ती रोखली जाणे आवश्यक आहे.