इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पतीने आपल्यासोबत दुसऱ्या महिलेला ठेवले असेल आणि पहिल्या पत्नीने घर सोडले तर त्याला गृहत्याग समजले जाणार नाही. तसेच अशा प्रकरणात पतीला घटस्फोटाचा अधिकारही मिळत नाही, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या पतीचे अपील फेटाळले आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णय देताना कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिरमिरी कोराया येथील रहिवासी असलेल्या उत्तमराम यांचा विवाह अर्जुनपूर जिल्ह्यातील सूरजपूर येथील रहिवासी कायसोन बाई यांच्याशी २५ वर्षांपूर्वी झाला. त्यांना तीन मुले आहेत. काही वर्षांनी उत्तमराम याने आणखी एका महिलेला घरात ठेवले. त्यामुळे कायसोन बाई घराबाहेर पडली. यामुळे संतापलेल्या पतीने मनेंद्रगड येथील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आणि घटस्फोटाची विनंती केली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. तसेच, घटस्फोटाचा अर्जही नामंजूर केला. त्यावर उत्तमरामने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती रजनी दुबे यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. तेव्हा याचिकाकर्त्याने सांगितले की, पत्नी घर सोडून गेली आहे. याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर झाला आहे. त्यामुळे त्यांना घटस्फोटाचा अधिकार देण्यात यावा, मात्र दुसरीकडे त्याचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचे प्रतिवादी पत्नीने म्हटले आहे. त्याचवेळी बाहेरच्या महिलेला आणून मला मूळ गावी जाण्यास भाग पाडले, असेही म्हटले आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने असे नमूद केले की, विवाहित पती-पत्नीच्या बाबतीत, अशा परिस्थितीत त्यागाचा मुद्दा उद्भवत नाही. प्रतिवादीने ज्या परिस्थितीत हे पाऊल उचलले ते योग्य होते. यासोबतच उच्च न्यायालयाने पतीचे अपील फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.