कोलकाता – ओढणी ओढणे, हात ओढणे, पीडितेला लग्नासाठी मागणी घालणे या कृती पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक हल्ला किंवा लैंगिण शोषण मानेल जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी कोलकाता उच्च न्यायालयाने एका निर्णयादरम्यान केली आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीला पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरविले होते.
फिर्यादीच्या माहितीनुसार, पीडित मुलगी ऑगस्ट २०१७ मध्ये शाळेतून घरी परतत होती. त्या दरम्यान आरोपीने तिची ओढणी ओढली आणि तिला लग्नासाठी मागणी घातली. तसेच मागणी अमान्य केली तर तिच्या शरीरावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली होती. आरोपीने पीडित मुलीचा विनयभंग करण्याच्या हेतूने ओढणी ओढण्यासह तिला लग्नाची मागणी घातली, असे सत्र न्यायालयाने सर्व पुरावे पाहून मान्य केले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणाले, की आरोपीने मुलीचा हात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिच्याशी लग्न करण्यासाठी इच्छा नसताना आणि स्पष्ट शब्दात लैंगिक मागणी घातली. यावर सत्र न्यायाधीशांनी आरोपीला पॉक्सोअंतर्गत कलम ८ आणि १२, भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४ बी, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा करण्यात दोषी ठरविले.
उच्च न्यायालयाचा निर्णय
या प्रकरणामध्ये सर्व पुरावे पाहून पीडितेच्या साक्षीत विसंगती असल्याचे न्यायमूर्ती विवेक चौधरी यांच्या खंडपीठाला आढळले. तक्रारकर्तीच्या काकांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडितेचा हात ओढला नसल्याच्या तथ्यालाही न्यायालयाने लक्षात घेतले. दहा दिवसांनंतर कलम १६४ अंतर्गत नोंदविलेल्या जबाबात पीडितेने पहिल्यांदा सांगितले की आरोपीने तिचा हात ओढला होता.
उच्च न्यायालय म्हणाले, की आरोपीने पीडितेची ओढणी ओढली आणि हातही ओढला. तिला लग्नाची मागणी घातली. अशी कृती लैंगिक शोषण किंवा लैंगिक हल्ल्याच्या व्याख्येत बसत नाही. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ सह कलम ३५४ अ अंतर्गत गुन्हा केल्याचे आरोपीचे उत्तरदायीत्व असू शकते. त्यामुळे आरोपीला कलम ३५४, ३५४ बी आणि ५०९ अंतर्गतच्या आरोपात दोषी मानले जाऊ शकत नाही. तसेच त्याला पॉक्सो अधिनियमाच्या कलम ८ आणि १२ अंतर्गत आरोपांवरही त्याला दोषी ठरविले जाऊ शकत नाही.