भुवनेश्वर, ओडिशा (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – वकिलांनी न्यायाधीशांना मायलॉर्ड किंवा यॉर लॉर्डशिप किंवा यॉर ओनर या शब्दांनी संबोधणे थांबवावे, अशी सूचना ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांनी प्रसिद्ध केली आहे. न्यायाधीशांना संबोधित करताना वकिलांनी मायलॉर्ड, यॉर लॉर्डशिप, यॉर ओनर या उपसर्गांचा वापर करू नये. न्यायालयाच्या सभ्यतेनुसार संबोधनासाठी सर यासह इतर कोणत्याही शब्दांचा वापर करता येऊ शकतो, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी २००९ साली दिल्ली उच्च न्यायालयात असताना न्यायमूर्ती मुरलीधर यांनी यॉर लॉर्डशिप संबोधू नये असे वकिलांना सूचित केले होते. मार्च २०२० मध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या वकिलांना सुद्धा त्यांनी अशाच सूचना केल्या होत्या. न्यायाधीशांना मायलॉर्ड किंवा यॉर लॉर्डशिप म्हटल्याने भारतात इंग्रजांच्या वसाहत काळाची झलक दिसून येते, असे बार काउंसिल ऑफ इंडियाने २००६ रोजी म्हटले होते.
गेल्या वर्षी जुलैमध्ये राजस्थान उच्च न्यायालयानेसुद्धा अशाच सूचना केल्या होत्या. न्यायाधीशांना सन्मानाने संबोधित केले पाहिजे परंतु त्यांना मायलॉर्ड किंवा यॉर लॉर्डशिप किंवा यॉर ओनर असे संबोधण्याची गरज नाही, असे २०१४ रोजी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वाच्च न्यायालयाने अशा सूचना केलेल्या असतानाही अनेक उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांना अजूनही मायलॉर्ड असे संबोधले जाते.