इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीनगर मानखुर्दचे उमेदवार नवाब मलिक यांच्या विरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामीन रद्द करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सॅमसन अशोक पाथरे यांनी मलिक आणि ‘ईडी’ला प्रतिवादी करत याचिका दाखल केली आहे.
मलिक यांचा जामीन रद्द करण्याबाबतची याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं. मलिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करण्यात आले. या प्रकरणी दोन आठवड्यांत याचिकेत अधिक पुरावे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन देताना दिलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप पाथरे यांनी केला आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेत मलिकांसह ‘ईडी’लाही प्रतिवादी करण्यात आले आहे. मलिक यांनी पाथरे यांच्या याचिकेला विरोध केला आहे. ९ डिसेंबर रोजी मलिक यांच्या मूळ जामीनाच्या अर्जासोबत यावर याचिकेवर सुनावणी होणार आहे.