मुंबई: संप करणा-या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर तात्काळ रूजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्यात २५० पैकी ५५ आगार बंद असून १९५ आगारातून वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहे.
एसटीच्या कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने एसटी प्रशासनाला संपाची नोटीस दिल्यानंतर प्रशासनाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहे. हायकोर्टात आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात सणासुदीच्या काळात संप करून सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याचे हायकोर्टाने म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला देऊ असेही हायकोर्टाने म्हटले.








