मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १७ सप्टेंबरपर्यंत उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. या याचिकेमध्ये राज्यात विविध ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी राणे यांनी केली होती. त्याचप्रमाणे दाखल केलेले गुन्हे चुकीच्या कलमांखाली दाखल केल्याने ते रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद होऊन न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. त्यामुळे नाशिक येथे दाखल झालेल्या गु्ह्यात त्यांना २ सप्टेंबर हजर राहण्याच्या नोटीसला सुध्दा ब्रेक मिळाला आहे. आता १७ सप्टेंबरला होणा-या सुनावणीनंतर पुढील कारवाईचा प्रक्रिया निश्चित होणार आहे. या याचिकेबाबत राणे यांचे वकील अॅड.संतोष मानेशिंदे यांनी सांगितले की, राणे यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल केले आहे. ते बेकायदेशीर आहे. २३ ऑगस्टला केलेले वक्तव्य प्रक्षोभक नव्हते. राणे यांच्यावर जिथे गुन्हे दाखल झाले आहे तेथे जाण्याची गरज नाही. या युक्तीवादात राज्य सरकारनेही पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे ग्वाही दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.