जळगाव – पोलिस भरती प्रक्रियेत गैरप्रकार समोर आला असून, हायटेक कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस भरती परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थ्याने पायाच्या नी कॅपमध्ये आणि कानात एक डिव्हाइस लपवला होता. पोलिसांनी हटकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. गैरप्रकार केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
येथील वाघ नगर परिसरात पोलिस भरतीची लेखी परीक्षा आयोजिक करण्यात आली होती. परीक्षार्थींना वर्गात सोडल्यानंतर परीक्षा सुरू होण्याआधी काही निमिटांपूर्वी लघुशंकेचे कारण सांगून एक परीक्षार्थी दोन ते तीन वेळा बाहेर जाऊन आला. पोलिसांना त्याच्या संशय आल्याने त्याची झडती घेतली असता नी कॅपमध्ये (गुडघा) चिपसदृश डिव्हाइस आणि कानामध्ये सूक्ष्म डिव्हाइस लपवल्याचे आढळले.
पोलिसांनी पकडल्यामुळे परीक्षार्थी चांगलाच घाबरला होता. दोन्ही डिव्हाइस दिसणार नाहीत, अशा पद्धतीने लपवून ठेवले होते. कानातील डिव्हाइस काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे संबंधित परीक्षार्थीला परीक्षेस बसू देण्यात आले. मात्र गैरप्रकार केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.