मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिस अबाबाहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाला मिळालेल्या (DRI MZU) माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल विभागाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने(डीआरआय)पाळत ठेवली होती.
संशयित प्रवाशांना डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ओळखले आणि त्यांना रोखून धरत त्यांच्या सामानाची कसून झडती घेतली असता, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये अतिशय चतुराईने लपवून ठेवलेली हलकी तपकिरी पावडर असलेली काही पाकिटे सापडली.या पावडरची चाचणी केल्यावर त्यात हेरॉईन असल्याचे आढळले. एकूण ७.९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारातील यांची किंमत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यामागे असलेल्या, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.