नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमा कंपनीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची थकबाकी मिळावी यासाठी माजी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून शासनाकडे सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा कपंनीकडे शेतकऱ्यांची असलेली थकबाकी वितरीत करण्यासाठी १९२७ कोटी रूपये मंजूर केले आहे. यापैकी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ६५६ कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती माजी खा. गोडसे यांनी दिली आहे.
खरीप २०२३ हंगामातील १९२७ कोटी रूपयांची शेतकऱ्यांची पीक विम्याची थकबाकी गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होती. यामध्ये नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.सदर रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून माजी खा.गोडसे प्रयत्नशील होते. दरम्यानच्या काळात गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंढे यांची भेट घेवून पीक विम्याची थकबाकी शेतकऱ्यांना लवकरात लवकर अदा करण्याची आग्रही मागणी केली होती.
शासनाने आज पीक विम्याची थकबाकी शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी १९२७ कोटी रूपये मंजूर केले आहे.पैकी अहमदनगर जिल्हयासाठी ७१३, नाशिक जिल्हयासाठी ६५६, जळगावसाठी ४७०, सोलापूर जिल्हयासाठी दोन कोटी ६६ लाख, साताऱ्यासाठी २७.७३ कोटी तर चंद्रपूरसाठी ५८.९० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे.येत्या काही दिवसातच ओरियंटल जनरल इश्यूरन्स कंपनीमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याच्या थकबाकीची रक्कम जमा होणार असल्याची माहिती माजी खा. गोडसे यांनी दिली आहे.ऐन सणासुदीच्या काळात पीक विम्याची थकबाकी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.