नाशिक : नॅशनल महामार्ग विभागाने खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक-मुंबई महामार्गाच्या पाहणी दौऱ्याची आणि तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. टोल प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळेच नाशिक-मुंबई महामार्गाची दुरावस्था झाल्याचा ठपका ठेवला असून महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १५ ऑक्टोंबर पर्यंन्तचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत महामार्गाची संपूर्ण दुरुस्ती न झाल्यास मुंबई-नाशिक एक्सप्रेसवे प्रा. लिमीटेड या टोल कंपनीच्या खात्यातील २६ कोटी ३४ लाखांची रक्कम काढून त्या रक्कमेतून महामार्गाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या तांत्रिक विभागाचे महाप्रबंधक बी.एम. साळुंके यांनी दिली. सदर रक्कमेत ५ कोटीच्या दंडांच्या ही रक्कमेचा समावेश आहे. खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून नॅशनल हायवे विभागाने केलेल्या या ठोस कारवाईमुळे नाशिक शहर तसेच इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसह प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून घोटी, इगतपुरी, कसारा या दरम्यानच्या नाशिक-मुंबई महामार्गाची मोठ्याप्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. महामार्गाला खूप ठिकाणी मोठमोठी खड्डे पडलेले असून काही ठिकाणी रस्ताच उखडला गेलेला आहे. अनेक ठिकाणी तर महामार्गावरील डाबर आणि त्याखालील खडीचा कच देखील निघून गेलेला आहे. नॅशनल हायवे प्रशासनाने टोल प्रशासनाला अनेकदा नोटीस बजावत महामार्ग दुरुस्तीचे आदेश दिले होते. तरीदेखील महामार्गाची दुरुस्ती होत नसल्याने खासदार गोडसे यांनी विविध तक्रारींची दखल घेत दहा दिवसांपूर्वी महामार्गाची विशेष पाहणी केली. यावेळी खा. गोडसे यांनी घोटी टोल नाका आअणि महामार्गावर टोल प्रशासनाला धारेवर धरीत खडेबोल सुनावले होते. खा. गोडसे यांनी महामार्गाची शंभर टक्के दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी ३० ऑक्टोबर पर्यन्त मुदत टोल कंपनीला दिली होती. टोल प्रशासनाच्या विरोधात महामार्ग विभागाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. खा. गोडसे यांच्या कडून आलेल्या तक्रारींची महामार्ग विभागाने गंभीर दखल घेत टोल प्रशासनाच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
येत्या १५ ऑक्टोबर पर्यन्तची महामार्गाची शंभर टक्के दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सोयीसाठी साधनसामुग्रीची सज्जता करा अन्यथा महामार्गाची दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या मुंबई-नाशिक एक्सप्रेसवे प्रा. लिमीटेड या टोल कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. दंड तसेच महामार्गाच्या दुरुस्तीसाठी टोल कपंनीकडून २६ कोटी ३४ लाख रुपये वसुल करण्यात येणार असून या रक्कमेतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्गाची दुरुस्ती करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. टोल कंपनीच्या खात्यातून वसुल करण्यात येणाऱ्या २६ कोटी ३४ लाख रुपयांच्या रक्कमेत ५ कोटी रुपयांच्या दंडाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. दुरावस्था झालेल्या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी टोल कंपनीला १५ ऑक्टोबर पर्यंन्तचा अल्टीमेटम देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या तांत्रिक विभागाचे महाप्रबंधक बी.एम. साळुंके यांनी दिली. महामार्ग विभागाच्या या धडक कारवाईमुळे टोल कंपनी खडबडले आहे. खा. गोडसे यांनी टोल कंपनीच्या विरोधात वेळोवेळी केलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने ही धडक कारवाई केली आहे.
अशी होणार २६ कोटी ३४ लाखांच्या कामांची विभागणी
१) नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्ती आणि इतर सोयी सुविधांसाठी : ६,२५,३७,६५९/-
२) या दरम्यानच्या मोठी दुरावस्था झालेल्या रस्त्याचे नुतनीकरण करण्यासाठी खर्च : १४,८२,१५,४६१/-
३) एकूण दंडाची रक्कम : २१,०७,५३,१२०/-
४) याव्यतिरिक्त ठोठविण्यात येणारा दंड : ५ कोटी
५) एकूण : २६,३४,४१,४००/-