नाशिक : मध्य रेल्वेकडून मनमाड – इगतपुरी दरम्यान टाकण्यात येणारी नवीन रेल्वे लाईनची लांबी वाढवून ती कसारा स्टेशनपर्यन्त करावी, या खासदार हेमंत गोडसे यांच्या मागणीला रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. या मागणी संदर्भात लवकरच रेल्वेच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून नवीन रेल्वेलाईनचे सर्वेक्षण करुन मनमाड – इगतपुरी या दोन मुख्य शहरांमध्ये टाकण्यात येणारी रेल्वे लाईन कसारा पर्यन्त टाकण्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या रेल्वे प्रवासात वेळेची बचत होणार असून नाशिक – मुंबई लोकल सेवा सुरु होण्याच्या मार्ग देखील मोकळा होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
दिल्ली येथे सुरु असलेल्या अधिवेशकाळात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची विशेष भेट घेवून या रेल्वे लाईन संदर्भात चर्चा केली. मनमाड – नाशिक – इगतपुरी दरम्यान नव्याने रेल्वे लाईन टाकण्यात येत आहे. तसेच कल्याण ते कसारा या दरम्यान देखील रेल्वेकडून एक नवी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. नाशिक ते मुंबई रेल्वेने जवळपास १८० किलोमीटर अंतर आहे. मात्र कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या घाट, डोंगर दऱ्यांच्या रस्त्यात रेल्वेला वाहतुकीला अनेक अडचणी येतात. यासाठी कसारा ते इगतपुरी दरम्यान रेल्वे इंजिनला अतिरिक्त इंजिन (बँकर) लावले जातात. त्यामुळे घाटातील चढाव पार करण्यात येतो. मात्र यामुळे वेळ व रेल्वेचा पैसा खर्च होता. आता रेल्वे मार्ग नव्याने जोडणी करणे सोयीचे झाले आहे. रेल्वे मार्गावर टनेल बनविणे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे सोयीचे झाले आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान बोगदा करणे, त्याचा डायमीटर वाढविणे तसेच उंचावरुन वेगवाने रेल्वे वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान नव्याने रेल्वे लाईनची जोडणी करुन नाशिक – मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करता येणार आहे.
नाशिक – मुंबई दरम्यान रेल्वे प्रवासात राजधानी एक्सप्रेसला केवळ सव्वा दोन तास लागतात मात्र पंचवटी एक्सप्रेसला जवळपास पावणे चार तासांचा वेळ लागतो. जर ही रेल्वेलाईन इगतपुरी – कसारा दरम्यान देखील टाकण्यात आली तर घाट परिसरात रेल्वेला लागणाऱ्या अतिरिक्त वेळेची बचत होईल, या संदर्भात सविस्तर माहिती खा. गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिली. खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याचे लक्षात आल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच रेल्वे मंत्रालयाच्या एका विशेष पथकाकडून कसारा ते इगतपुरी दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पाहणी करण्यात येणार असून या संदर्भातला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार या नव्या लाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी देवून रेल्वे मार्ग टाकण्याला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दानवे यांनी खासदार गोडसे यांना या बैठकीप्रसंगी दिले.
घाट रस्त्याचा अडथला दूर होणार
मनमाड – इगतपुरी दरम्यान नव्याने टाकण्यात येणारी रेल्वे लाईन थेट कसारा पर्यंन्त नेल्यास या मार्गावर लागणाऱ्या वेळेची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा पैसा देखील वाचणार आहे. सध्यास्थितीत रेल्वेला इगतपुरी – कसारा दरम्यान बँकर लावले जातात तरीदेखील गाडी घाटात थांबत थांबत जाते. या नव्या रेल्वे लाईनमुळे बोगद्यांचा डायमीटर वाढविला जाणार आहे. इगतपुरी – कसारा दरम्यानचा घाट रस्त्यात ही रेल्वे लाईन टाकल्यामुळे वेगाने रेल्वे प्रवास होणे शक्य होणार असून नाशिक – मुंबई दरम्यान लोकल सेवा देखील यामुळे सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याच्या आशा पलवित झाल्या आहेत.
वेळेची बचत होण्यास मदत
या नव्या रेल्वे लाईनमुळे नाशिक-मुंबई दरम्यान रेल्वे प्रवासाला लागणाऱ्या वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. इगतपुरी – कसारा दरम्यान रेल्वेला लागणाऱ्या वेळ वाचल्यामुळे नाशिक- मुंबई ही दोन मुख्य शहर अजुन जवळ येणार असून त्यामुळे विकासाला अधिकाधिक चालना मिळेल तसेच लोकल सेवा देखील सहजपणे नाशिक पर्यन्त सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
खासदार हेमंत गोडसे, नाशिक