नाशिक – खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातुन लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी सुमारे दीड कोटी रूपयांच्या निधीला जनसुविधा योजनंतर्गत मंजुरी मिळाली आहे . या मंजुर कामांमध्ये इगतपुरी तालुक्यातील सहा त्रंबकेश्वर तालुक्यातील चार , सिन्नर तालुक्यातील तीन तर नाशिक तालुक्यातील दोन अशा पंधरा विकास कामांचा समावेश आहे . येत्या काही दिवसांत मंजुर झालेल्या विकास कामाचा शुभारंभ होणार असून प्रत्यक्ष कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती खा . हेमंत गोडसे यांनी दिली आहे .
नाशिक लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी खा . गोडसे सततच प्रयत्नशील असतात . जनसुविधा योजनेतंर्गत विकास कामांसाठी निधी मंजुर व्हावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे . जनसुविधा योजनेतंर्गत पंधरा विकास कामांसाठी सुमारे दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . या कामांमध्ये इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे दशक्रिया विधी शेड बांधणेकामी दहा लाख, बारशिंगवे येथे स्मशानभूमी घाट बांधणेकामी पाच लाख , नांदुरवैद्य येथे स्मशानभूमी घाट व निवारा शेड बांधणेकामी दहा लाख , मौजे सांजेगाव येथे स्मशानभूमी व अनुषंगिक कामे करणेकामी दहा लाख , सोनोशी स्मशानभूमीच्या कामासाठी पाच लाख व भावली खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणेकामी पंधरा लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे .
सिन्नर तालुक्यातील शिवडे स्मशानभुमि अनुषंगीक कामांसाठी दहा लाख , पंचाळे येथे स्मशानभुमि शेड बांधणेकामी दहा लाख , नळवाडी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी दहा लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे . त्रंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहोळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणेकामी पंधरा लाख , बोंबीटेक ( अंबोली ) स्मशानभुमि बांधकाम करणेकामी पाच लाख , बेरवळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणेकामी पंधरा लाख , अस्वली हर्ष येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणेकामी दहा लाख रूपयांचा निधी तर नाशिक तालुक्यातील शिलापुर येथे घाट बांधणेकामी दहा लाख व चांदगिरी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी दहा लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे . निधी मंजुर झालेल्या विकास कामांचा प्रारंभ येत्या काही दिवसांत होणार असल्याची माहिती खा . हेमंत गोडसे यांनी दिली आहे .