नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला न सोडता ती शिवसेना ठाकरे गटाला सोडल्यामुळे काँग्रेसच्या नेत्या डॅा. हेमलता पाटील कमालीच्या नाराज झाल्या आहे. त्यांनी बंड करुन या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करत ४६ हजार ३०० मते मिळवली होती. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे त्यांची संधी गेली. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत मनोगतही व्यक्त केले.
प्रिय बंधु, भगिनी आणि वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार.
आपणास ठावूक आहेच, मी गेली ३० वर्षे कॅांग्रेस पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने करत आहे. नाशिक महापालिकेत ही कार्यरत राहून नगरसेविका या नात्यानं आमची या शहराविषयी वाटणाऱ्या तळमळीतून नागरिकांचे प्रश्न सोडवित आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये माझी कोणतीही तयारी नसताना ऐनवेळी कॅांग्रेस पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आणि मी केवळ १२ दिवसांमध्ये तब्बल ४६३०० मताधिक्य घेतले. हे काय दर्शवते? तुमचा माझ्या कार्यपद्धतीवरचा विश्वास आणि प्रेम हेच यातून मला जाणवले.
आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाने मला आश्वासन दिले होते. परंतु शेवटच्या क्षणी ही जागा उबाठा गटाला सोडली. कॅांग्रेस पक्षाला संपूर्ण नाशिक शहरामध्ये चारपैकी एकही जागा वाट्याला आलेली नाही. हे दुर्दैव.. म्हणूनच मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निश्चय केला आहे. ही निवडणूक माझ्यासाठी पक्ष आणि माझ्या विचारांच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची आहे. आपण पहात आलात, की मी सदैव आपल्या सर्वांच्या सुखदुःखात सोबत असते. मला कधीच वाटले नव्हते की अपक्ष सामोरे जावे लागेल… परंतु वेळ तशी आहे.
कारण नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची गेल्या दहा वर्षात झालेली वाताहत डोळ्यांसमोर पहाताना वेदना होताहेत. गुंडगिरी, भाईगिरी, भयंकर वाहतुककोंडी, धर्माधर्मात , समाजासमाजामध्ये निर्माण झालेली तेढ, बेरोजगारी, ड्रग्जचा भयंकर विळखा, दिवसाढवळ्या नागरी वस्तीत सर्रास होणारे खून, जगण्याचे वाढत चाललेले भय आणि भय निर्माण करणाऱ्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी हे पहाता माझं नाशिक ढासळते आहे, असेच म्हणावे लागेल…
बंधु भगिनींनो, मला खात्रीच आहे, तुम्ही मला साथ द्याल..
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेले हे शहर पुन्हा नव्याने घडवायचे आहे. याच विचारांचा वारसा असलेली मी जिजाऊंची, सावित्रीची, राणी लक्ष्मीबाईची लेक आहे. आपले सुसंस्कृत सभ्य आणि गुण्यागोविंदाने नांदणारे शहर या स्वार्थी, अहंकारी, गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांनी संपवले आहे. आता आपल्याला पुन्हा ते दिवस आणायचे आहेत. सुसंस्कृत जीवनाची आणि नव्या जगाच्या प्रगतीची नांदी झाली पाहिजे.. मी कळकळीने हात जोडून सांगते, माझ्यासोबत रहा, हे गमावलेले शहर आपल्याला पुन्हा मिळवायचे आहे.
आपली स्नेहांकित
डॅा हेमलता निनाद पाटील.