नाशिक – गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक शहरात हेल्मेट सक्ती साठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. मात्र या मोहिमांचा कोणताही प्रभाव दुचाकी चालकांवर दिसून आला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता नवी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
नाशिक शहरात सुरवातीला ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेनंतर हेल्मेटची शिस्त लागावी यासाठी हेल्मेट नसलेल्यांविरुद्ध आधी समुपदेशन नंतर परीक्षा अशी प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यालाही दुचाकी चालक जुमानत नसल्याचे पाहून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आता नवी शक्कल लढवली आहे.
येत्या नवीन वर्षात १८ जानेवारीपासून विना हेल्मेट दुचाकीधारकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश आयुक्तांनी दिले असून लवकरच याच्या अंमलबजावणी ला सुरवात होणार आहे. यामध्ये ई चलन अंतर्गत ५०० रुपयांचा दंड असणार असून त्याचबरोबर दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास ०१ हजार रुपये दंड आणि तीन महिने लायसन्स निलंबित करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे विना हेल्मेट धारकांना चालकांना चाप बसणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात हेल्मेट सक्ती संदर्भांत कठोर पावले उचलली जात आहेत. अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करीत हेल्मेटचा वापर वाढविण्यासाठी पोलिस आयुक्तांनी यापूर्वी केलेल्या निर्णयाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता अधिक कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या मोहिमेत विना हेल्मेट धारकांवर पोलिसांची नजर असणार आहे. त्या बरोबर दुचाकी चालकासोबत सोबत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट अनिवार्य असणार आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.