चेन्नई (तामिळनाडू) – देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि ११ संरक्षण अधिकारी यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर आज दुपारी कुन्नूर परिसरात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करीत होते. त्यात रावत यांच्यासह त्याची पत्नी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे.
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर Mi-17V5 ला कुन्नूर येथे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की जंगलामध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. हेलिकॉप्टर हे झाडांवर आदळले. त्यानंतर या हेलिकॉप्टरचा मोठा स्फोट झाला. आगीच्या ज्वाळांनी हेलिकॉप्टरला वेढले. त्याची तत्काळ माहिती हवाई दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यामुळे तातडीने बचाव पथक जंगलाकडे निघाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत प्रवास करीत होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हवाई दलाचे हे अतिशय शक्तीशाली हेलिकॉप्टर समजले जाते. असे असतानाही ही दुर्घटना का घडली याच्या चौकशीचे आदेश भारतीय हवाई दलाने दिले आहेत. तसेच, हवाई दलप्रमुख चौधरी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची डीएनए टेस्टद्वारे ओळख पटविली जाणार आहे.
https://twitter.com/rajnathsingh/status/1468560192497328129?s=20
हेलिकॉप्टर कोसळताच तातडीने हवाई दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारार्थ नेण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्याबरोबरच त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, हवालदार सतपाल हे प्रवास करीत होते. दुर्घटनेत नक्की कुणाकुणाचा मृत्यू झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, हेलिकॉप्टरचे पायलट यांच्यासह अन्य माहिती अद्याप संरक्षण दलाने दिलेली नाही. दरम्यान, या दुर्घटनेबद्दल सर्वच स्तरातून अतिशय दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपतींनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तर, राजनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांना सर्व घटनेची माहिती देऊन रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही भेट दिली. (बघा दुर्घटनास्थळाचा व्हिडिओ)
https://twitter.com/ANI/status/1468493903921770499?s=20
कोण आहेत बिपीन रावत
रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुखपद भूषविलेले आहे. ते डिसेंबर २०१९ मध्ये त्यांचा लष्कर प्रमुख पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर मोदी सरकारने त्यांची नियुक्ती सीडीएस या पदावर केली. हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. कारगील हल्ला आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांनी काही शिफारशी केल्या होत्या. त्यात या पदाचा समावेश आहे. हवाई दल, नौदल आणि लष्कर अशा तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवणे आणि पंतप्रधानांसह संरक्षण मंत्र्यांना सल्ला देण्याचे काम सीडीएस यांचे आहे. संरक्षण क्षेत्रातील हे सर्वात वरचे पद आहे.