मुंबई – तामिळनाडूतील कुंभकोणम शहरात दोन वर्षांपूर्वी एका शाही कारणासाठी हेलिकॉप्टर बंधू सर्वांना परिचित होते. मात्र आता त्यांनी जे कृत्य केले आहे ते विजय माल्या, मेहूल चौकसी, नीरव मोदी यांच्यासारख्या स्टँडर्ड दरोडेखोरांच्या रांगेत त्यांना नेऊन बसविणारे आहे. मरियूर रामदास गणेश आणि त्याचा भाऊ यांच्याविरोधात आता संपूर्ण शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत.
या दोघांचाही डेअरीचा व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी मरियूरने आपल्या एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस शाही पद्धतीने साजरा केला. संपूर्ण शहरावर त्याने हेलिकॉप्टरमधून गुलाबाचा वर्षाव केला होता. शहरातील प्रत्येक व्यक्ती या पार्टीचे साक्षीदार आहेत. मात्र आता हेच हेलिकॉप्टर बंधूने चक्क ६०० कोटी रुपये घेऊन फरार झाले आहेत. मरियूर रामदास गणेश आणि मरियूर रामदास स्वामीनाथन या दोघांवरही ६०० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्या अटकेची मागणी करणारे पोस्टर शहरात लावण्यात आले आहे. तंजावूर जिल्हा गुन्हे शाखेने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला असून त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरला अटकही केलेली आहे.
अशी केली फसवणूक
दोन्ही भावांनी लोकांना गुंतवणुकीतून चांगले रिटर्न देण्याचे आमिष लोकांना दिले. त्यात त्यांनी अनेकांकडून पैसा घेतला. यांच्या कंपनीत १५ कोटी रुपये जमा करणाऱ्या एकाने तक्रार केल्यामुळे हे बिंग फुटले. पोलिसांनी दोघांवरही फसवणूक, विश्वासघात आणि गुन्ह्याचे षडयंत्र रचण्याचे कलम लावले आहे. या दोघांचेही विविध देशांमधील व्यापाऱ्यांशी संबंध आहेत. त्यामुळे आता त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.
कोण आहेत हेलिकॉप्टर बंधू
तिरुवरूर येथील रहिवासी हेलिकॉप्टर बंधू काही वर्षांपूर्वी कुंभकोणमला स्थायिक झाले. विदेशी प्रजातीच्या गायींच्या डेअरीचा व्यवसाय सुरू केला. येथील पॉश एरियात राहायचे आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरायचे, हा त्यांचा शौक होता.