पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्राचीन काळापासून आयुर्वेदात तसेच भारतीय आहार शास्त्रात दुधाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना लहान मुलांसाठी दूध हे पूर्ण अन्न मानले गेले आहे. तसेच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत दुधाचा आपल्या आरोग्यासाठी चांगला उपयोग होतो. विशेषतः रात्रीच्या वेळ झोपण्यापूर्वी दूध सेवन करणे निश्चितच चांगले मानले जाते. लहानपणापासूनच आपल्याला दूध पिण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. दूध प्यायल्याने उंची वाढते असे आपण आजी, मावशी किंवा आईकडून अनेकदा ऐकले असेल. आज आपण हेच जाणून घेऊ की रात्री गरम दूध पिण्याचे फायदे काय आहेत….
– मुलींनी दूध प्यायल्याने केस लांब होतात असे ऐकले असेल. या सर्व गोष्टींमध्ये रात्री गरम दूध पिण्याचे फायदे जाणून घेणे आवश्यक आहे.
– दूध प्यायल्याने कॅल्शियमची मात्रा पूर्ण होते. जे आपल्या दात आणि हाडांसाठी फायदेशीर आहे.
– चुकीच्या आहारामुळे अनेकदा काही जण बद्धकोष्ठतेची तक्रार करतात. अशा स्थितीत गरम दूध प्यायल्याने फायदा होतो. गरम दूध पचनासाठी खूप फायदेशीर आहे.
– आजकाल तणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. आपल्याला तणाव वाटत असेल तर कोमट दूध प्यावे. यामुळे ताणतणावातून आराम मिळण्यास मदत होईल. दूध प्यायल्यानंतर आपल्याला आराम वाटेल.
– दिवसभराचा थकवा दूर करून आरामात झोपायची असेल तर गरम दुधाची मदत घेऊ शकता. तसेच, जर तुम्हाला लवकर थकवा येत असेल तर दररोज दूध पिण्याची सवय लावा.
– थंडीच्या मोसमात घशाची समस्या अनेकदा उद्भवते. हा त्रास होत असेल तर कोमट दूध प्या. हवे असल्यास त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर किंवा आले घाला.
– रात्री दूध पिण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे ते प्यायल्यानंतर चांगली झोप लागते. त्यातही कोमट दूध प्यायल्याने छान झोप येते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
– आपल्याला हवे असल्यास दुधात खजूर, बदाम, साय किंवा थोडी साखर टाकू शकता.