नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात नाशिक जिल्ह्यासह काही जिल्ह्यात जून ते ऑगस्ट व सप्टेंबर, २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरण आज शासन निर्णयान्वये करण्यात आले असून त्यात नाशिक जिल्ह्याला जून, जुलै २०२२ मधील झालेल्या नुकसानीसाठी रू.२५ लाख ४९ हजार, ऑगस्ट सप्प्टेंबर २०२२ मधील नुकसानीसाठी रू. २३ लाख असा जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी एकूण रू. ४८ लाख ४९ हजार निधी जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सिन्नर येथे झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून तात्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी शासनस्तरावर यासाठी पाठपुरावा केला होता.
राज्यात माहे जून व जुलै, २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतीपिकाचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जून व जुलै, २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरीत करण्यात आला आहे.
जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीमध्ये झालेल्या व होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता शासन ११ ऑगस्ट २०२१ अन्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात आल्याने वाढीव दराने मदत देणे आवश्यक आहे. तसेच माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे प्रस्ताव संबंधित विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाल्यानुसार देण्यात आलेल्या निधीमध्ये वाढीव दराने व माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीतसाठीही झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
यात मृत जनावरांसाठी मदत, पुर्णत: नष्ट,अंशत: पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे यासारख्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय असलेला बाबींच्या नुकसानीकरिता बाधितांना राज्य वाढीव दराने मदतीचे वाटप करण्याकरिता या शासन निर्णयान्वये रू. ७ कोटी २४ लाख ६६ हजार तसेच माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीत मालमत्तेच्या नुकसानीकरिता रुपये २० कोटी ६९ लाख १८ हजार असा एकूण रुपये २७ कोटी ९३ लाख ८४ हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत राज्यातील विविध अतिवृष्टी ग्रस्त संबंधित जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाने मंजूरी देण्यात आली आहे.
त्यात नाशिक जिल्ह्याला जून, जुलै २०२२ मधील झालेल्या नुकसानीसाठी रू. २५ लाख ४९ हजार, ऑगस्ट सप्प्टेंबर २०२२ मधील नुकसानीसाठी रू. २३ लाख असा जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी एकूण रू. ४८ लाख ४९ हजार निधी वितरित करण्यात आला आहे. या मंजूर निधीमध्ये मुख्यत्वे ज्या घरांची पडझड झाली आहे किंवा ज्या पात्र घरांमध्ये दुकानांमध्ये सामानाची नासधूस झाली आहे याचा मुख्यत्वे समावेश आहे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्याचे व वेळोवळी या संदर्भात निर्गमित शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे, असे निर्देश या शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या होत असलेल्या नुकसानींचेही तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे.
Heavy Rainfall Crop Loss Government Financial Aid
Nashik District