मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशात भीषण उष्णतेची लाट आलेली आहे. अनेक राज्यांमधील काही भागात तापमापकातील पारा ४० ते ४५ अंशाच्याही वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांनी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घ्यावा, अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशाशित प्रदेशांना केल्या आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यासाठी आढावा घ्यावा आणि संवेदनशील क्षेत्रात पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा, अशा सूचना केंद्राने केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ते लिहितात, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य, पश्चिम आणि उत्तर भारतात तापमान सामान्यपेक्षा अधिक वाढणार आहे. या भागात अनेक ठिकाणी पारा यापूर्वीच ६ अंश अधिक म्हणजेच ४६ अंशावर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी शीत उपकरणांसाठी अखंड वीजपुरवठा करावा. देशभरात भारनियमन होत असल्यामुळे जिथे शक्य असेल तिथे सौरऊर्जा पॅनलचा वापर करावा अशा सूचना केल्या आहेत.
उष्णतेच्या तीव्र झळा लागलेल्या नागरिकांवर योग्य उपचारासंबंधित प्रभावी व्यवस्थापन करावे, सर्व जिल्ह्यांना तीव्र उष्णतेशी संबंधित आजारांबाबत राष्ट्रीय कार्य योजनेसंदर्भातील दिशानिर्देशांचे दस्ताऐवज पाठवण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. उष्णेतमुळे होणारे त्रास रोखण्यासाठी तसेच त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी केंद्राने एक यादी प्रसिद्ध केली आहे. आरोग्य केंद्रांवर आवश्यक औषधे आणि आयव्ही फ्लूइड, ओआरएस, बर्फाच्या लाद्या, थंड पिण्याचे पाणी यासारख्या वस्तूंसह सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
दिशानिर्देशानुसार, दिवसा कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडताना छत्री वापरावी, टोपी किंवा रूमाल बांधावा, दिवसा कामासाठी जाताना उन्हाच्या तीव्रतेनुसार नियोजन करावे, तहान लागली नाही, तरी पाणी पित राहा, दारू, उष्ण पेये किंवा कार्बोनेटेड पेयांचे सेवन करू नका.
एक मार्चपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमा (आयजीएसपी) अंतर्गत उष्णेतशी संबंधित आजारांचे दैनंदिन निरीक्षण करावे. दैनिक निरीक्षण अहवाल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला (एनसीडीसी) शेअर करावा, असा उल्लेख आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.
शरीराचे तापमान वाढल्यास, शुद्ध हरपल्यास, किंवा आणखी काही त्रास झाल्यास संबंधितांनी १०८/१०२ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ४० अंश सेल्सियस किंवा १०४ अंश फॅरेनहाइटच्या वर शरीराचे तापमान जाणे, स्नायू कमकुवत होणे किंवा अकडणे, मळमळ आणि उलटी होणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि धाप लागल्यासारखी लक्षणे वैद्यकीय आणीबीणी म्हणून ओळखली गेली आहे. अशी कोणतीही लक्षणे दिसून आली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.