अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाळ्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. येथे अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४५ अंशांच्या वर पोहोचला आहे. काही ठिकाणी आर्द्रता आणि वाढत्या तापमानामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. येत्या चार-पाच दिवसांत तापमान आणखी वाढणार आहे, म्हणजेच उष्मा आणखी वाढणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार इतक्यात तरी उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार नाही. पश्चिम राजस्थानमध्ये, मध्य प्रदेश, विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही अशीच स्थिती राहील. येथे २ मे नंतर पारा जेमतेम एक ते दोन अंशांनी कमी होऊ शकतो. बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्रालाही उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार नाही, असेच दिसते आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज कमाल तापमान ४४ अंशांवर पोहोचेल. गुजरातमध्ये पारा ४५ अंशांवर जाईल. दुसरीकडे, मध्य प्रदेशात कमाल तापमान ४३अंश राहण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये पारा ४० अंशांवर पोहोचू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये किमान कमाल तापमान ४४ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये पारा ३९ अंश आणि झारखंडमध्ये ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.
तीव्र उष्णतेची लाट
भारतासह संपूर्ण दक्षिण आशियातील एक अब्जाहून अधिक लोकसंख्या तीव्र उष्णतेच्या आणि उष्णतेच्या लाटेत सापडली आहे. शास्त्रज्ञांनी या तीव्र हवामानाचे कारण हवामानातील बदलांना दिले आहे. सध्या कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेपेक्षा उष्मा हा चिंतेचा विषय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उष्णतेमुळे लोक आजारी पडत आहेत. दुसरीकडे, दिल्लीतील हवामान खात्याने पुढील तीन दिवस कडक उष्मा कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. वायव्य भारतात पारा ४७ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
इतक्या उष्णतेचे कारण काय?
यावर्षी एप्रिल महिन्यात अजिबात पाऊस झाला नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये हलका पाऊस पडत असे, त्यामुळे तापमानात थोडीशी घट होत असे, पण यावेळी तसे झाले नाही. १ मार्चपासून सरासरीच्या ८७ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळेच होळीपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. म्हणून उष्णता वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.