मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात उन्हामुळे वातावरण तापले आहे. उष्माघातासारखी आव्हाने टाळण्यासाठी दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून अनेक शहरांमध्ये केले जात आहे. मात्र तापमानात येत्या काळात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. एप्रिलमध्ये उत्तर – पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आपल्या मासिक अहवालात तापमान आणि पावसाचे वर्णन करताना भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, “दक्षिण द्वीपकल्प आणि ईशान्य भारताच्या लगतच्या भागांसह पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्य किंवा सामान्य तापमानापेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे.” त्यापूर्वी, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. १ एप्रिलपासून उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
पावसाच्या संदर्भात विभागाने एप्रिल महिन्यात काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात आणि ईशान्य भारताच्या काही भागात पाऊस कमी प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, दक्षिण द्वीपकल्पातील बहुतेक भाग आणि मध्य भारत आणि ईशान्य भारताच्या लगतच्या भागांमध्ये जास्त पाऊस पडेल.
विषुववृत्तीय पॅसिफिकमधील ला निना स्थितीचा संदर्भ देत विभागाने सांगितले की या काळात ला निना स्थिती कायम राहील. प्रशांत महासाहराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते तेव्हा पश्चिमेकडील भागात हवेचा दाब कमी होत असतो. प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील पूर्व दिशेस वारे वाहतात आणि ढग जमलेली पाण्याची वाफ तिकडे वाहून नेतात. त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते त्याला ला लिना म्हणतात. ते म्हणाले की, ला निना आणि एल निओ हे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात होत असलेल्या नियतकालिक बदलांचा संदर्भ देतात, ज्याचा जगभरातील तापमानावर परिणाम होतो. एल निओ आणि ला निना भाग ९ ते १२ महिने टिकतात, परंतु काहीवेळा २ वर्षे देखील असतात.