विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तो कसा नष्ट होऊ शकतो यावर वेगवेगळे तर्क लावण्यात आले होते. काहींच्या मते तो जास्त तापमानात नष्ट होतो, तर काहींच्या मते तो कमी तापमानात निष्क्रीय होतो अशा चर्चाही रंगल्या. या सगळ्या चर्चा सुरू असताना कोरोना विषाणूवर जास्त तापमानाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.
कोरोना विषाणू ५० अंश तापमानातही आपले काम प्रभावीपणे करत असतो. ५० अंशाच्यावरील तापमानात विषाणू होरपळू लागतो. ८० अंशाच्या वर तो पूर्णपणे नष्ट होत नाही. त्याचा काही भाग सक्रिय असतो. कोरोना विषाणूवर उष्णता आणि वाढत्या तापमनाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉयरोलॉजी आणि आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी पहिले संशोधन केले आहे. त्यामध्ये वेगवेगळे निष्कर्ष समोर आले आहेत.
संशोधनानुसार, कोरोना विषाणू ५० अंशावर जळताना त्याच्या बाहेरील संरचनेत असलेल्या छत्रीसारख्या आकारातील स्पाइक प्रोटिन नष्ट होऊ लागतात. तसेच आतील संरचनेत चट्ट्यांसारखे व्रण दिसतात. एखादा किटक चावल्यानंतर आपल्या त्वचेवर पडलेल्या व्रणासारखे हे व्रण दिसतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ६० ते ७० टक्के भाग नष्ट झाल्यानंतरसुद्धा ३० ते ४० टक्के भाग जळण्यापासून वाचतो. त्या भागाला नष्ट करण्यासाठी जवळपास १०० अंश तापमानाची गरज पडू शकते.
आठ वेगवेगळ्या तापमानात तपसणी
कोरोना विषाणूला २, ४, १२, ३६, ४५, ५०, ६५ आणि ८० अंश तापमानावर ठेवून संशोधन करण्यात आले आहे. ५० अंशाहून कमी तापमानावर विषाणूच्या सायटोपॅथिक प्रभावात कोणताच बदल झाला नाही. ५० अंशा किंवा त्याहून अधिक तापमानामुळे सर्वात प्रथम बाहेरील संरचना नष्ट होऊ लागली. जसेजसे तापमान वाढत गेले तसे विषाणूच्या आतील संरचना नष्ट होत गेली. ८० अंश तापमानात विषाणूचे बहुतांश भाग जळाला होता. परंतु काही भाग बाकी होता. या स्थितीत विषाणूचा सायटोपॅथिक प्रभाव निष्क्रीय झाला होता.
उन्हामुळे विषाणू नष्ट होण्याच्या चर्चा
कोरोना महामारीच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्र झळांमुळे कोरोना विषाणू नष्ट होतो, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केले होते. विषाणूपासून बचावासाठी लोकांनी उन्हात बसावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. आतापर्यंत तापमानामुळे विषाणूच्या प्रतिक्रियेबाबत कोणतेच संशोधन झाले नाही. परंतु २५ ते ३५ अंश तापमानावर विषाणू अचानक वाढू लागतो आणि वेगाने नवे बाधित रुग्ण आढळू लागतात, हे दिसून आले आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये अशी स्थिती पाहायला मिळाली होती. त्यादरम्यान पर्वतीय क्षेत्रात तापमान २० अंशापेक्षा कमी होते आणि तिथे नवे रुग्णही आढळले नव्हते.
काही भागात ५० अंशाच्या वर जातो पारा
एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनुसार, देशाच्या विविध भागातील तापमान पाहिल्यास काही भागात तापमापकातील पारा ५० अंश किंवा त्याहून अधिक वर जातो. बहुतांश भागात पारा ५० अंशाच्या खालीच असतो. अशा तापमानात विषाणूवर कोणताही परिणाम जाणवला नाही. गेल्या वर्षीच राजस्थानातील चुरू येथे ५० अंश तापमान नोंदवले गेले होते. माणूस इतक्या जास्त तापमानात राहू शकत नाही. त्यामुळे वातावरणानुसार विषाणू नष्ट होण्याची कल्पना केली जाऊ शकत नाही.
विषाणूवर तापमानाचा किती परिणाम
तापमान पहिला साइटोपॅथिक प्रभाव नंतरचा साइटोपॅथिक प्रभाव
२ ते ४५ +++ +++
५० +++ ++
६५ ते ८० +++ कोणताच प्रभाव नाही
(+++ विषाणूचा परिणाम दाखवण्यासाठी सांख्यिकी तंत्रज्ञानाचा वापर)