नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत ३४ नव्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी औषधे, अँटीबायोटिक्स, लशी यांचा समावेश असून त्याच्या किंमती स्वस्त होणार आहे. तर, अत्यावश्यक औषधांच्या या यादीतून २६ औषधे सरकारने हटवली आहेत.
आरोग्य विभागाकडून अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी जाहीर करण्यात येते. यंदा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही यादी नुकतीच जाहीर केली असून, २७ श्रेणींमधील ३८४ औषधांचा समावेश आहे. यामध्ये आयव्हरमॅक्टीन, म्युपिरोसिन आणि मेरोपेनेमसारख्या संसर्ग प्रतिरोधक औषधांचा समावेश करण्यात आला आहे. आता या यादीमध्ये औषधांची संख्या ३८४ झाली आहे. कॅन्सरविरोधी औषधे, अँटीबायोटिक्स, लशी व इतर औषधे आता अधिक स्वस्त होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबको दवाई सस्ती दवाई या धोरणानुसार मंत्रालय विविध पावले उचलत आहेत.
श्वसनाचीही औषधे, गर्भनिरोधक औषधे यांचाही सुधारित यादीत समावेश आहे. अंतस्त्रावी औषधे आणि गर्भनिरोधक फ्लूड्रोकोर्टिसोन, ओरमेलोक्सिफेन, इन्शुलिन ग्लरगाइन आणि टेनेनिग्लिटीन यांचा समावेश करण्यात आला आहे. श्वसनमार्गाचे औषध मॉन्टेलुकास्ट आणि नेत्रविकारावरील औषध लॅटानोप्रोस्ट यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. ह्रदय आणि रक्त वाहिन्यांच्या देखभालीसाठी वापरण्यात येणाऱ्या डाबिगट्रान आणि टेनेक्टेप्लेस याशिवाय अन्य औषधांना यादीत स्थान मिळाले आहे. संसर्ग प्रतिरोधक आयव्हरमॅक्टीन, म्युपिरोसिन, मेरोपेनेम, सेफ्युरोक्साइन, एमिकासिन, बेडाक्विलाइन, डेलामेनिड, इट्राकोनाजोल एबीसी डोलटेग्रेवीर यासारख्या औषधांचादेखील सुधारित यादीत स्थान मिळाले आहे. औषधविषयक स्थायी राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. वाय. के. गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, यादीतून काही औषधे वगळण्यातही आली आहे. त्यामध्ये रॅनिटिडीन, सुक्रालफेट, व्हाइट पेट्रोलेटम, अँटेनोलोल तसेच मेथिडोल्पा यांच्यासह २६ औषधांना यादीतून वगळ्यात आले आहे.
Heart Attack Cancer Medicines Now Cheapest All List