इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देश कोणताही असो उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला रोजगाराची गरज असतेच. मात्र यासोबत निरोगी आयुष्य देखील गरजेचे असते. दिवसाला १० हजार पाऊले चालण्याची सवय ही आरोग्यासाठी फायद्याची असल्याचे म्हटलं जातं. हल्ली तर अनेक विमा कंपन्याही तंदरुस्त व्यक्तींकडून काही ठरावीक विमा पॉलिसींसाठी कमी प्रमाणात प्रमिअम घेतात. अनेक कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांनी नियमितपणे चालावं यासाठी छोट्यामोठ्या स्पर्धांचं आयोजन करत असतात. असाच पुढाकार ब्रिटनमधील एका कंपनीने घेतला आहे. कंपनीने एका विशिष्ट जागेसाठी चक्क रोज १० हजार पाऊल चालण्याची अट ठेवली असून भरघोस पगार देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
म्हणून दिली ऑफर
युनायटेड किंग्डममधील ‘जीमबर्ड’ नावाच्या कंपनीने चीफ स्टेप ऑफिसरच्या शोधात असल्याचं म्हटलं होतं. कंपनी पहिल्यांदाच या पदावर एखाद्या व्यक्तीची भरती करत असल्याचंही सांगण्यात आलेलं. या कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ही कंपनी रोज १० हजार पावलं चालणाऱ्या व्यक्तीला तब्बल १०हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच ८ लाख रुपयांहून अधिक पगार देणार आहेत. एका वृत्तानुसार या चीफ स्टेप ऑफिसरने या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चालण्यासंदर्भातील प्रेरणा देणं अपेक्षित आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना दिवसाला १० हजार पावलं चालायची सवय लागत नाही तोपर्यंत त्यांना प्रेरित करण्याचं काम या व्यक्तीला करावा लागणार आहे. कंपनीकडून चीफ स्टेप ऑफिसर किती चालतो याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्याला स्मार्टवॉच देणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या एका महिन्यासाठी ही चीफ स्टेप ऑफिसरची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे.
या आहेत अटी
चीफ स्टेप ऑफिसर म्हणून आपला अनुभव आठवड्यातून एकदा सोशल मीडियावर शेअर करणंही अपेक्षित आहे. या पोस्टमुळे इतर लोकांनाही चालण्याची प्रेरणा मिळू शकते असं कंपनीचं म्हणणं आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीने यासाठी अर्ज करायचा आहे. ही व्यक्ती अमेरिकन असावी किंवा कायमची अमेरिकेत निवासी असलेली असावी. प्रत्येक आठवड्याचे अनुभव या व्यक्तीने शेअर करणं अपेक्षित असून ते व्हिडीओ माध्यमातून असणही बंधनकारक आहे. दर आठवड्याला सोशल मीडियावर एक पोस्ट करणं बंधनकारक असणार आहे. इतरांना प्रेरणा देण्यासाठी सोशल मीडियावरील ही पोस्ट बंधनकारक असणार आहे. तसेच या नोकरीमुळे पैशांबरोबरच अर्ज केल्यानंतर निवडण्यात आलेला चीफ स्टेप ऑफिसर हा स्वत: फार तंदरुस्त राहील असंही कंपनीने म्हटलंय. जीमबर्ड’चे सहसंस्थापक अश्ले वॉल्टन यांनी भविष्यामध्ये आम्ही अशापद्धतीच्या अधिक नोकऱ्या दिर्घकालीन नोकरी उपलब्ध करुन देऊ असं म्हटलं आहे. लोकांनी हलचाल केली पाहिजे, त्यांनी व्यायाम केला पाहिजे यासाठी त्यांना प्रेरित करणं गरजेचं असल्याचं आरोग्यासंदर्भात काम करणाऱ्या या कंपनीचं म्हणणं आहे.4
Health Walking Exercise Company Offer 8 Lakh Salary