इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत गरजेची असते. कारण, जर रात्रीची शांत झोप तुम्हाला मिळाली नाही तर त्याचे तुमच्या तब्येतीवर दूरगामी विपरीत परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांच ऐकायचं तर व्यवस्थित आणि शांत झोपेसोबतच आपण कसे झोपतो तेही महत्त्वाच असतं. आपण जसे झोपतो, त्याचाही आपल्या तब्येतीवर परिणाम होत असतो. म्हणूनच झोपताना कसं झोपावं, हे देखील आपल्याला माहीत असायला हवं.
रात्रीची झोप पूर्ण होणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण कोरोनाच्या काळात इतर गोष्टींप्रमाणे झोपेच्याही समस्या निर्माण झाल्या. लॉकडाऊनमुळे माणसे सतत घरातच असल्याकारणाने झोपेवरही परिणाम झाला. यामुळे काही दुखणी देखील मागे लागली. डॉक्टरांच्या मते, मोठ्या माणसांना दररोज 6 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. पण यासाठी झोपण्याची पद्धतीही योग्य हवी.
पाठीवर झोपणे
पाठीवर झोपणे, हा प्रकार सर्वाधिक दिसतो. अशाप्रकारे झोपण्याचे फायदेही अनेक आहेत. पाठीवर झोपल्याने मणका सरळ राहतो. छातीवरील ताण कमी होतो, आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. जेवल्यानंतर असं झोपल्याने अन्नाचे पचन चांगले होते. काही संशोधनानुसार चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाण पाठीवर झोपल्याने कमी होते. तसेच डोळ्याखालील काळी वर्तुळे देखील कमी होऊ शकतात.
पोटावर झोपणे
पोटावर झोपण्याला घरातील ज्येष्ठ मंडळी पसंती देत नसली तरी अभ्यासकांच्या मते असं झोपणं पण फायदेशीर ठरू शकतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घोरणं आटोक्यात राहतं. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही चांगले राहते.
(टीप- खरं तर आपल्याला ज्या पद्धतीने झोपण सोयीचं असेल त्या पद्धतीने झोपणं, केंव्हाही चांगलं. त्यातही काही त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)