पुणे – आपल्या उत्तम प्रकृतीसाठी पाणी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, म्हणूनच त्याला जीवन असे म्हणतात. त्याचा आपल्याला अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी पाणी साठवणूक करण्याची पद्धत आणि त्याचा वापर या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आपण पाहूया पाणी लाभदायक ठरण्यासाठी उपयुक्त अशी भांडी. यातील पाणी जर तुम्ही प्यायलात तर तुम्हाला अपाय नक्कीच होणार नाही.
कुठेही बाहेरगावी जाताना किंवा ऑफीस, शाळा अशा सगळ्या ठिकाणी पाणी नेताना आपण प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या बाटल्यांची निवड करतो. त्यातून पाणी नेणं सोयीचे असल्याने आपण ते पाहतो. पण त्यातून पाणी पिणं फारसं सुरक्षित नाही. त्यापेक्षा काचेच्या बाटल्या जास्त चांगल्या असतात. त्यात कोणत्याही रसायनाचा वापर केला जात नाही. त्यामुळे त्यातून पाणी पिणे जास्त सोयीचे असते. शिवाय या बाटल्या धुण्यासाठी देखील सोयीच्या असतात. सरबत, पाणी पिण्यासाठी वापर करणे फायद्याचे ठरू शकते. फक्त काचेची बाटली खरेदी करताना ती रंगीबेरंगी असणार नाही याची काळजी घ्या. कारण अशा रंगीत बाटल्यांमध्ये केमिकल असण्याची शक्यता आहे.
ज्यांच्या घरात आजी – आजोबा अशी वृद्ध माणसे आहेत, त्यांनी लहानपणापासून घरात हमखास तांब्याची भांडी पाहिली असतील. विशेषतः तांब्याच्या तांब्यात पाणी ठेवलेले पाहिले असेल. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नेहमीच आरोग्यदायी असते. हे पाणी प्यायल्याने शरीरातील वात, कफ तसेच पित्त दोष संतुलित होण्यास मदत होते. तसेच यामुळे शरीरातील पीएच पातळी देखील नियंत्रणात राहते.
अलीकडे मातीच्या बाटल्या देखील उपलब्ध होतात. माठातील पाणी पीत असल्याचा फील येतो त्याने. यात कोणतीही घातक रसायने नसतात. यातून पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया उत्तम होते. ऍसिडिटीचा त्रास होत नाही. आपण जेव्हा फिल्टर केलेले पाणी पितो, तेंव्हा त्यातून सगळी खनिजद्रव्य निघून जातात. पण मातीची बाटली तसे होऊ देत नाही. पाण्यातील मिनरल्स टिकवण्यासाठी ती मदत करते. आणि ती आपल्याला मिळाल्याने तब्येतीचा फायदाच होतो.