नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयुर्वेदात हळदीला संजीवनी बुटी मानले जाते. याचा वापर मसाल्याच्या स्वरुपात केला जातो. यात अनेक औषधीय गुणधर्म आहेत आणि ते आरोग्यासाठी तसेच सौंदर्य कायम ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. वैद्यकीय क्षेत्रात हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. विशेष म्हणजे हळद ही मधुमेहावर गुणकारी असून ब्लड शुगर नियंत्रीत ठेवण्यासाठी त्याचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी डॉक्टर हळदीच्या सेवनाचा सल्ला देतात. कारण बदलत्या वातावरणामुळे उद्भवणाऱ्या आजारांना टाळण्यासाठीही हळद उपयुक्त ठरत असते. त्यामुळे हळद ही एखाद्या औषधापेक्षा कमी नाही, हे समजून घेतले पाहिजे. एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की हळदीत करक्युमिन आढळले जाते. हेच करक्युमिन मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. हळद ग्लायसीमियाला कमी करते. त्यासाठी मधुमेह असलेल्यांनी दररोज सकाळी उठल्यावर नाश्त्याच्या वेळी हळदीचे दूध घ्यायला हवे.
हळद, दूध आणि काळे मिरे
एक ग्लास कोमट दुधात हळद मिक्स करायची आणि त्यानंतर दूध थंड करून घ्यायचे. त्यानंतर त्यात काळे मिरे टाकायचे. काळे मिरे यात पिपेरीन असते आणि हळदीत करक्यूमिन. या दोघांच्या सेवनाने रक्त वाहिन्यांची सुरक्षितता वाढते.
हळद आणि दालचिनी
दररोज सकाळी हळद, दूध आणि दालचिनीला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आणि त्याचे सेवन करायचे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
हळद, आले आणि दूध
चिमुटभर आले हळदीच्या दुधात मिक्स करून सेवन केल्यास सुद्धा ब्लड शुगर नियंत्रणात राहते. याशिवाय आवळ्याच्या रसात चिमुटभर हळद मिक्स केली तर ती देखील मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.