पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपले मोत्यासारखे दात असावे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु त्याचबरोबर दातांची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण दात स्वच्छ आणि चांगले असतील, तरच आपले आरोग्य योग्य राहू शकते. त्यामुळेच आपल्याला योग्य प्रकारे आहार घेता येणे शक्य होते. त्या करिता दररोज व्यवस्थितपणे दात घासणे आवश्यक असते. त्याचबरोबर दातांमध्ये कोणत्याही प्रकारे टोकदार वस्तू घालणे योग्य ठरत नाही.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर दातांमध्ये अडकलेले अन्न काढण्यासाठी अनेक जण टूथपिकचा वापर करत असल्याचे अनेकदा पाहिले असेल. केवळ पुरुषच नाही तर अनेक महिलाही हे करतात. पण हे करत असताना एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्या दात आणि हिरड्यांसाठी मोठी समस्या निर्माण करू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण टूथपिकने आपले दात जलद स्वच्छ करतो तेव्हा ते आपल्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे तुम्ही टूथपिक वापरत असाल तर काळजी घ्या. दातांवर टूथपिक वापरल्याने दातांना आणि हिरड्यांना इजा होऊ शकते.
टूथपिक्स वापरण्याचे दुष्परिणाम खूप आहेत. दातांमधील अंतर- टूथपिकने दात स्वच्छ केल्याने तुमच्या दातांमधील अंतर वाढू शकते आणि त्यामुळे ते खराब दिसतात.
दातांवर टूथपिक वापरल्याने दातांच्या इनॅमलचा थर खराब होतो, ज्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात.
दातांवर टूथपिक्सचा सतत वापर केल्याने त्याची मुळे कमकुवत होऊ शकतात. टूथपिकने दात घासताना ते तुटले किंवा दातांमध्ये टूथपिक अडकले तर त्यामुळे दातांच्या ऊतींना नुकसान होऊ शकते.
टूथपिक किंवा मॅचस्टिकने दात मिटवल्याने तुमच्या हिरड्यांना इजा होऊ शकते. तसेच हिरड्यांमधून रक्तस्त्राव होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो.
टूथपिक किंवा मॅचस्टिकने दात साफ करण्याऐवजी कडुलिंबाच्या काड्या वापरू शकता. कारण कडुलिंब बॅक्टेरियाविरोधी आहे. दररोज अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून दात स्वच्छ धुवावे. तसेच अन्न खाल्ल्यानंतर ब्रश करावेत.