पुणे – आजच्या काळात घोरण्याच्या समस्या अनेकांना असते, मात्र घोरणारा तो घोरतो हे कधीही मान्य करत नाही. किंबहुना, त्या झोपेच्या अवस्थेत त्याला अनेकदा त्याची कल्पनाही नसते. पण कधी कधी घोरण्याचा हा आवाज इतका मोठा असतो की माणसाची झोप भंग पावते. ही स्थिती स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकते. अनेकदा लोक ही समस्या वयाशी जोडतात. अनेकांना वाटते की, घोरणे ही वृद्धत्वाची एक सामान्य प्रक्रिया आहे, म्हणूनच घोरण्याबद्दल अनेकदा विनोद केले जातात. पण घोरणे देखील जीवघेणी स्थिती बनवू शकते?
१) घोरणे हे सामान्यतः चांगल्या झोपेचे लक्षण मानले जाते. घोरणारा चांगला झोपतो हे सांगणारे अनेक जण आढळतील. परंतु प्रत्यक्षात, जलद घोरणारी झोप ही गाढ आणि शांत झोप नाही तर ती एकंदर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
२) घोरण्याच्या या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये जास्त वजन किंवा लठ्ठपणा, अडथळा आणणारा स्लीप अॅपनिया म्हणजे झोपताना श्वासोच्छवासात अडथळा, नाक, तोंड किंवा घशाची बिघडलेली रचना, निद्रानाश, कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जी, दिनचर्यामध्ये असंतुलन, मद्य आणि सिगारेटचे जास्त सेवन, चुकीची झोपण्याची मुद्रा आणि घसा किंवा नाकाचा काही आजार असू शकतो.
३) घोरण्यामुळे देखील गंभीर समस्या उद्भवू शकतात तसेच पुरेशी झोप मिळणे कठीण होऊ शकते. कारण घोरणे थेट तुमच्या श्वासोच्छवासाच्या स्थितीत अडथळा आणते. जेव्हा श्वासोच्छ्वास व्यवस्थित होत नाही, तेव्हा शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि हृदय, मेंदू यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना त्रास होतो. अशीही परिस्थिती असू शकते की काही सेकंदांमध्ये श्वास थांबतो, ही स्थिती घातक देखील असू शकते. झोपेत घोरण्याच्या समस्येने त्रास होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४) घोरण्याची समस्या टाळण्यासाठी अनेक वेळा लोक घरगुती उपचार किंवा ओव्हर द काउंटर औषधांचा वापर करतात, त्यामुळे अडचणी देखील येऊ शकतात. आजकाल बाजारात नाकाच्या पट्ट्या, स्प्रे, गोळ्या इत्यादी अनेक प्रकार उपलब्ध आहेत, मात्र प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याचा वापर करणे जीवघेणे ठरू शकते. मात्र, झोपताना काही गोष्टी लक्षात ठेवून घोरणे कमी करता येते.
५) झोपण्याची स्थिती बदलणे, तसेच एका बाजूला झोपणे फायदेशीर ठरू शकते. बाजारात उपलब्ध असलेल्या शरीराच्या लांबीइतकी मोठी उशी वापरणे फायदेशीर ठरू शकते. ती एका बाजूला झोपायला मदत करतात. तसेच डोके उंच करून झोपण्याचा सराव करावा. यामुळे श्वास घेणे सोपे होईल आणि घोरणे कमी होईल.
६) घोरणे टाळण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेऊन वजन संतुलित ठेवावा. यामुळे घशातील स्नायू संकुचित होण्यास मदत होईल, त्यामुळे घोरणे कमी होते. वारंवार होणाऱ्या अॅलर्जीमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो. तसेच त्याकरिता बेडरूम व्यवस्थित आणि कमीत कमी ठेवा. जड अन्न, मांसाहार आणि दारू, सिगारेट यापासून दूर राहा. शरीर हायड्रेटेड ठेवा, भरपूर पाणी प्यावे. यामुळे घसा आणि नाकात पुरेसा ओलावा राहील. काही कारणाने नाकाच्या हाडाचा आकार बिघडला असेल तर उपचार करावेत.