पुणे – जेवण करताना शक्यतो, कोणतेही शिळे पदार्थ खाऊ नयेत, असे डॉक्टर नेहमी सांगतात. तरीही अनेक घरांमध्ये रात्री उरलेले शिळे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सकाळी गरम करून खाल्ले जातात. विशेषत : भात किंवा खिचडी सारखे पदार्थ गरम करून सकाळी नाश्त्यासाठी दिले जातात. परंतु भात दुसऱ्यांदा गरम करून खाणे अत्यंत धोकादायक आहे, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अनेक घरात उरलेला भात गरम करून पुन्हा सकाळी जेवणात वापरला जातो. तर कधी याचा वापर फोडणीचा भात तर कधी बिर्याणी बनवण्यासाठी केला जातो. पण हे चविष्ट वाटणारे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू कसे शकतात जाणून घेऊ या…
रात्री केलेला भात हा फ्रिजमध्ये ठेवल्यावर सकाळी हा भात पुन्हा गरम केल्यावर त्या अन्नातून विषबाधा होऊ शकते. कारण भात थंड झाल्यावर त्यात बॅसिलस सेरियस नावाचे बॅक्टेरिया (जीवाणू) वाढू लागतात. पुन्हा गरम केलेल्या तांदळामध्ये, हे जीवाणू भात गरम झाल्यामुळे नष्ट होतात, परंतु त्याचे घटक भातामध्ये राहतात, आणि ते विषारी असू शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण हा भात खातो, तेव्हा हे विषारी घटक शरीरात शिरतात आणि विषबाधा होते.
एका आहार अभ्यासानुसार, शिजवलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. कारण असे केल्याने ते जीवाणूंचे प्रजनन केंद्र बनू शकते. कारण त्यात काही जीवाणू हे या प्रक्रियेत टिकून राहू शकतात. यामुळे भात पचवणे कठीण होते. तसेच पुन्हा गरम केलेल्या तांदळामध्ये पोषक घटकांची कमतरता असते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते. तसेच, पोटाच्या अनेक प्रकारच्या समस्या सुरू होऊन अण्णा विषबाधा होते. तसेच अन्न विषबाधाच्या लक्षणांमध्ये अतिसार, उलट्या, ओटीपोटात दुखणे, ताप, थंडी वाजणे यांचा समावेश आहे.